दिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते. मात्र ११ वर्ष उलटूनही त्याच्या दुरूस्तीकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. अखेर सिंगद येथील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यथा मांडली आहे. नांदगव्हाण धरण फुटल्यामुळे महापूर येऊन दिग्रस, सिंगद, रुई, साखरी आदी गावातील जवळपास १ जणांचा नाहक बळी गेला. मात्र अद्यापही धरण दुरूस्तीसाठी शासनाला जाग आलेली नाही. दिग्रस शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने हे धरण बांधले गेले. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या. शासनाने वेळीच कारवाई केली असती तर उन्हाळ््यात जनावरांसाठी पाण्याची सोय झाली असती, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज होती. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, पालकमंत्री यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे स्वत: लक्ष घालावे, संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा मागवून धरणाचे काम पूर्ण करावे, जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटी रुपयांचा खर्च होत आहे. नांदगव्हाण धरणाचेही काम केले तर जलयुक्त शिवारला हातभारच लागणार आहे. हे धरण दुरूस्त झाल्यास सिंगद व धरणाखालील गावांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात भीमराव झळके या शेतकऱ्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
नांदगव्हाण धरणाची दुरूस्ती रखडली
By admin | Published: January 22, 2017 12:15 AM