यवतमाळ - बेरोजगार युवकांना कर्ज काढून देण्याचे आमिष देत माजी आमदाराच्या स्वीय सहायकाने (पीए) बनावट कागदपत्रे बनवून परस्पर पैसे उकळले. हा प्रकार लक्षात येताच माजी आमदारांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात आपल्या स्वीय सहायकासह आणखी एका विरोधात फसवणूक व खोटे दस्तावेज तयार केल्याची तक्रार दाखल केली. काँग्रेसच्या माजी आमदार नंदिनी पारवेकर यांचा स्वीय सहायक नीलेश सुरेंद्र ठोंबर (४०) रा. पारवा ता. घाटंजी व गौरव मानेकर (३२) रा. सिंघानियानगर या दोघांनी पारवेकर यांच्या स्वाक्षरीचे खोटे दस्तावेज तयार केले. शिवाय पारवेकर यांच्या बँक खात्याचा दहा लाखांचा धनादेशही तयार केला. या आधारावर या दोघांनी संजय जाधव, प्रेम जाधव, रोहण चंदनखेडे, पजगाडे, गौरव भंगाडे यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. त्यांना शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार आणि पशुसंवर्धन विभागातून अनुदानावर कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दिले होते. हा प्रकार संजय जाधव यांनी नंदिनी पारवेकर यांना संपर्क केल्यानंतर उजेडात आला. याबाबत नंदिनी पारवेकर यांनी चौकशी केली व फसवणूक झालेल्या युवकांकडील कागदपत्रांची पाहणी केली असता. त्यांच्या नावाने पीए नीलेश ठोंबरे याने खोटे दस्तावेज तयार केल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर ठोंबरे याने पारवेकर यांच्या नावाने असलेल्या बँक खात्याच्या धनादेश क्रमांक २७२१११ हा दहा लाख ८० हजार रुपये इतकी किंमत टाकून परस्परच प्रेम जाधव याला दिला. फसवणुकीचे हे प्रकरण उजेडात येताच नंदिनी पारवेकर यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली. यावरून वडगाव रोड पोलिसांनी पीए नीलेश ठोंबरे व गौरव मानेकर यांच्या विरोधात भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक नंदकुमार आयरे करीत आहेत.
माजी आमदारांचे नाव वापरुन ‘पीए’चा बेरोजगारांना गंडा, काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांनी दिली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 6:17 PM