यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला. यात नंदिनी नीलेश भंडारी हिने ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे. ती पुसद येथील जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. तर यवतमाळ पब्लिक स्कूलने (वायपीएस) यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे.
वायपीएसमधून परीक्षेला बसलेले सर्व १२९ विद्यार्थी दहावीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. नील बुटले हा विद्यार्थी ९७.२ टक्के गुणांसह शाळेतून पहिला आला आहे. शिवाय, स्कूल आॅफ स्कॉलर्समधून ओम कावलकर व कुणाल साबळे हे दोन विद्यार्थी ९६.८४ टक्के गुणांसह शाळेत अव्वल ठरले. सानिका चोरे (९२.८) केंद्रीय विद्यालयातून अव्वल ठरली आहे. अद्यापही काही शाळांची गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.