यवतमाळकरांची कलाकृती : गायकांनी जागविल्या आठवणी यवतमाळ : स्वातंत्र्य चळवळीत देशभक्तांना प्राणप्रिय झालेल्या ‘वंदेमातरम् गीता’च्या सुरांनी मंगळवारी यवतमाळात पुन्हा एकदा राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग चेतविले. मात्र, यावेळी गीताचे सूर, संगीत अस्सल यवतमाळकरांचे होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळाला. क्रांतिदिनानिमित्त मंगळवारी ‘वंदेमातरम् स्फूर्तीगीता’च्या सीडीचे विमोचन करण्यात आले. येथील नटराज संगीत अकादमीचे किशोर सोनटक्के आणि बाबा चौधरी यांनी क्रांतिदिनाच्या औचित्याने आपल्या स्टुडिओमध्ये वंदे मातरम् गीत संगीतबद्ध केले. विशेष म्हणजे, संगीत यवतमाळच्याच अजिंक्य किशोर सोनटक्के या तरुणाने दिले आहे. मालेगावचे प्रा. अशोक जाधव यांचे स्वर लाभले आहे. तर नीलेश पराते यांनी छायांकन केले आहे. मंगळवारी राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सीडीचे विमोचन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. हे स्फूर्तीगीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यूट्यूब, टिष्ट्वटर, फेसबुकवर प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. हे स्फूर्तीगीत तीन मिनिटांचे असून ते स्थानिक स्टुडिओमध्येच संगीतबद्ध करण्यात आले, हे विशेष. सीडी विमोचनप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सहायक जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
नटराजच्या ‘वंदे मातरम्’ने चेतविले स्फुलिंग
By admin | Published: August 10, 2016 1:14 AM