आर्णी : तो जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध. पण कधीही त्याने कुणापुढे मदतीसाठी हात पसरला नाही. स्वाभिमान हेच त्याचे तत्त्व होते. अंध असूनही तो कुणाच्याही मदतीला तयार असायचा. अशा या हरहुन्नरी माणसाचा मृत्यू मात्र अत्यंत करुण झाला. चिखली येथील नारायण दामोदर शेडमाके (५८) यांच्या जाण्याने अख्खा आर्णी तालुका हळहळत आहे.नारायण शेडमाके अंध असूनही डोळस माणसांना लाजवेल असे काम त्यांनी केले. ते नेहमी प्रवास करायचे. मालीश करण्यासाठी तो प्रसिद्ध होता. अनेकदा आर्णीतील व्यापाऱ्यांची कामे करताना तो दिसायचा. अगदी आजूबाजूच्या गावात जावून डबा आणणे, निरोप देणे, सामान पोहचवणे, साउंड सिस्टिमवाल्यांना मदत करणे, आर्णी बसस्थानकावर कंट्रोलर आॅफिसमध्ये बसणे, मदत करणे, पानठेल्यावरील सुपारी फाडणे आदी अनेक कामे तो सहज करायचा. यातून आपले कुटुंब चालवायचा. एकदा परिचय झाला की आवाज ऐकून नावाने हाक द्यायचा. मालीशसाठी जिल्हाभरात त्याला राजकीय नेते, पोलीस विभागातील लोक बोलवत. परंतु, त्याचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. नारायण २२ जुलै च्या रात्री आर्णीवरुन चिखलीला जात होता. चिखली फाटा आर्णी-दिग्रस रोडवर आहे. फाट्यावरुन एक किलोमीटर पायी जावे लागते. मध्ये एक नाला आहे. त्या दिवशी रात्री जोरदार पाऊस सुरू होता. नाल्यावरील पुलावरुन पुरातून जाताना त्याचा पाय घसरला असावा. हा वाहत गेला. आज शिवारात नाल्याच्या काठाला त्याचा मृतदेह दिसला. तीन दिवस झाल्याने मृतदेह कुजला होता. त्याच्या मुलाने त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल, बाजूला पडलेली छत्री काढली. त्यावरुन त्याची ओळख पटली. नारायणच्या जाण्याने केवळ चिखलीच नव्हेतर जिल्ह्यातील ओळखीच्या प्रत्येकाला धक्का बसला. आंधळा असूनही नारायणने कुणासमोर कधी हात पसरला नाही. आधी काम करायचे नंतरच त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असे स्वाभिमानी आयुष्य नारायण शेवटपर्यंत जगला. अंध असूनही नारायण डोळस माणसांसाठी प्रेरणादायी होता, असे मत सामाजिक कार्यकर्ते नितेश पाटील बुटले यांनी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)
दृष्टीहीन असूनही स्वाभिमान जपणाऱ्या नारायणचा करुण अंत
By admin | Published: July 26, 2016 12:10 AM