नेर : अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने १५ जागा जिंकत एकहाती सत्ता संपादन केली. शिवसेनेला या संस्थेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राकाँ-भाजपाने केलेल्या युतीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे उमेदवार तथा माजी सभापती फेर मतमोजणीत एका मताने पराभूत झाले. गेली महिन्याभरापासून या संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. शिवसेनेचे समन्वय पॅनल आणि काँग्रेस-राकाँ-भाजपा युतीचे शेतकरी सहकारी पॅनल रिंगणात होते. रविवारी या संस्थेच्या १९ जागांसाठी ९८ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. ही निवडणूक दोन्ही पॅनलने प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, राष्ट्रवादीचे वसंतराव घुईखेडकर, भाजपाचे पुरूषोत्तम लाहोटी यांनी युतीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र त्यांच्या शिवसेनेला या संस्थेपासून दूर ठेवण्याच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरले गेले. मतदारांनी शिवसेनेच्या बाजुने कौल दिला. १५ जागा जिंकत शिवसेनेने संस्था ताब्यात घेतली. या निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघातील सहकार क्षेत्रावरही पकड असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेस-राकाँ-भाजपा युतीचे सुभाष गुगलिया (१६७), नितीन खाबिया (११८), युवराज अर्मळ (२८), इर्शाद अहमद (१२७) हे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन कुडमेथे, बी.के. कुडमेथे यांनी काम पाहिले. नेर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात शिवसेनेने मिळविलेला हा विजय अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. यामध्ये नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांची भूमिका मोलाची आहे. शिवसेनेकडून परमानंद अग्रवाल, बाबू पाटील जैत, भरत मसराम, संजय दारव्हटकर, नामदेव खोब्रागडे, गजानन भोकरे, गुलाब महल्ले, राजेंद्र गोळे आदींनी विजयासाठी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)शिवसेनेचे विजयी उमेदवार ४भाऊराव ढवळे (१८४), निखील पाटील जैत (२०१), मनोहर जाधव (१७०), मिथुन भगत (१७२), प्रवीण राठोड (१७४), संजय माने (१६७), दिवाकर राठोड (१९६), दिनेश भोयर (१९०), संगीता मुंजेवार (२०१), सागरीबाई राठोड (१८३), प्रशांत मासाळ (१८८), शिवशंकर राठोड (१६८), नितीन रंगारी (१८३), रवींद्र राऊत (१९५), किशोर जैन (१६८). शिवसेना व युतीचे पराभूत उमेदवार४दिलीप तिमाने (१६२), राजेंद्र चिरडे (१५०), गजानन गोळे (१४७), दिलीप देशमुख (१५७), प्रकाश भेंडे (१५४), केशव सोळंके (१५६), श्याम ठाकरे (१७०), परसराम राठोड (१६१), अलका जगताप (१६७), शोभा घावडे (१५७), नितीन भोकरे (१६४), सोनल राऊत (१४६), दिलीप खडसे (१५७), लता ठाकरे (१४६), संतोष चौधरी (८७), विष्णू राठोड (११७), गफ्फार टिक्की (४३), नितीन बोकडे (८).
नेर बाजार समिती शिवसेनेकडे
By admin | Published: January 19, 2016 3:42 AM