यवतामळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकत्सा पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने रॅगिंग झाल्याची तक्रारी केली. या प्रकरणात द्वितीय व तृतीय वर्षाच्या पाच डाॅक्टरांना निलंबित करण्यात आले. त्यानंतरही विद्यार्थ्याकडून तक्रारी हाेत असल्याने साेमवारी महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील पथक दाखल झाले. त्यांनी प्रकरणाची निगडीत सर्वांचाच जबाब नाेंदविला.
सर्जरी पीजीच्या प्रथम वर्षाला असलेल्या डाॅ. अनमाेल भामभाणी याच्या आईने मुलाची रॅगिंग हाेत असल्याची तक्रार दिली. यासाठी पीजीच्या द्वितीय व तृतीय अभ्यासक्रमाला असलेल्या पाच डाॅक्टरांवर आराेपी केले आहेत. या पाचही डाॅक्टराचे महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ निलंबन केले.
या प्रकरणाची निष्पक्ष चाैकशी व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाचे संचालक डाॅ. दिलीप म्हैसकर यांनी आराेग्य विद्यापीठातील समितीकडून चाैकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार साेमवारी (ता.३०) दुपारी डाॅ. पुष्पा जुनघरे यांच्या अध्यक्षतेतील समिती यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाली. यामध्ये डाॅ. रमेश पराते, डाॅ. ए.ओ. दहाड यांचा समावेश आहे. समितीने सर्वप्रथम तक्रारदार विद्यार्थी व त्याच्या आईचा जबाब घेतला. त्यांनी रॅगिंग संदर्भात दिलेले पुरावे ठेवून घेतले. नंतर ज्या पाच डाॅक्टरांवर आराेपी आहे त्यांना समितीने चाैकशीकरिता बाेलाविले. याशिवाय इतरही काहींचे जबाब समितीने नाेंदविले आहे.
तो व्हिडीओ २०१६ मधील
रॅगिंग हाेत असल्याची तक्रार करत वैद्यकीय संचालकाकडे सादर केलेला व्हिडीओ २०१६ मधील असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे तक्रार दाराने दिलेल्या तक्रारीत किती तथ्य आहे. याचीही चाैकशी करण्यात येत आहे. डाॅ. अनमाेल भामभानी याने तक्रार दिल्यानंतर त्याच्या साेबत असलेल्या सात विद्यार्थ्यांनी रॅगिंग हाेत असल्याची संयुक्त तक्रार दिली. यातील आराेपांची चाैकशी हाेत आहे. खरच रॅगिंग की वैयक्तिक आकस याचाही तपास केला जात आहे.
सतत गैरहजर राहणाऱ्यांच्या तक्रारी
पदव्यूतर अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या भराेशावर रुग्णालयाचे कामकाज सुरू असते. शस्त्रक्रीयेपासून रुग्णांची देखभाल करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून असलेले पीजीचे विद्यार्थी महत्वाचा घटक आहेत. सध्या हाेत असलेल्या तक्रारी मध्ये सातत्याने गैरहजर असलेल्याची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. रॅगिंग पेक्षा कामाचा ताण हाच वादाचा मुद्दा असल्याचे महाविद्यलयाच्या वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.