ट्रक उलटला : प्रवाशांचे हाल, पोलिसांची निष्क्रीयता धनोडा / हिवरा संगम : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उलटलेल्या ट्रकमुळे तब्बल १२ तास वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ, नांदेड आणि माहूर या तीनही मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रक काढण्यास झालेल्या दिरंगाईचा फटका टीईटीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेकडो प्रवाशांना बसला.महागाव तालुक्यातील धनोडा ते हिवरासंगम गावादरम्यान नांदेडहून सुपारी घेऊन निघालेला ट्रक शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उलटला. या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबचलांब रांगा तीनही मार्गावर लागल्या होत्या. विशेष म्हणजे अपघातस्थळी केवळ एक होमगार्ड परिस्थिती हाताळत होता. महागाव पोलीस आणि महामार्गा पोलीस सकाळपर्यंत अपघातस्थळी पोहोचलेच नव्हते. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रक बाजुला करण्यास प्रचंड विलंब लागला. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत हा ट्रक त्याच ठिकाणी होता. त्यामुळे त्याचा त्रास शेकडो प्रवाशांना बसला. शनिवारी शिक्षक पात्रता परीक्षा होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी जाणार होते. परंतु अपघातामुळे त्यांना परीक्षेस पोहोचण्यास विलंब झाला. महामार्गावर अपघात झाल्यास तात्काळ महामार्ग पोलिसांना धाव घ्यावी लागते. परंतु या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस पोहोचले. तसेच महागाव पोलीसही येथे आले नव्हते. शेकडो वाहनधारक कमालीचा रोष व्यक्त करीत होते. अखेर दुपारी १ वाजताच्यानंतर हा रस्ता मोकळा झाला. आणि वाहतूक सुरळीत झाली. मात्र पोलिसांच्या निष्क्रीयतेचा फटका प्रवाशांना बसला. (लोकमत चमू)
राष्ट्रीय महामार्ग १२ तास ठप्प
By admin | Published: January 17, 2016 2:27 AM