अविनाश साबापुरे
यवतमाळ : अल्पसंख्याक समाजातील नववी ते बारावीत शिकणाऱ्या मुलींसाठी यंदा प्रथमच बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलद्वारे राबविली जात आहे. त्यात राज्यातील ४५ हजार ५४० विद्यार्थिनींची निवड झाली असून, त्यांच्या खात्यात लवकरच पैसे टाकले जातील, अशी माहिती शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
२०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजनेसाठी ४८ हजार ५५५ विद्यार्थिनींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पडताळणीनंतर ४५ हजार ५४० अर्ज पात्र ठरले आहेत. तर अटी पूर्ण न करणारे, कागदपत्रांची पूर्तता न करणारे तसेच अपूर्ण स्वरुपातील जवळपास तीन हजार अर्ज डिफेक्ट किंवा रिजेक्ट करण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.
मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन समाजातील इयत्ता नववी ते बारावीतील मुलींसाठी केंद्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते. आजपर्यंत या शिष्यवृत्तीसाठी शाळांकडून थेट केंद्र शासनाकडे अर्ज सादर केले जात होते. मात्र, यंदा पहिल्यांदाच योजनेत बदल करून ही शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलवर लाँच करण्यात आली. तसेच अर्जांची पडताळणी करण्यासाठी शाळा आणि जिल्हा असे दोन टप्पे ठरविण्यात आले.
विशेष म्हणजे त्या-त्या राज्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले. महाराष्ट्रात अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालकांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्र शासनामार्फत अद्याप राज्यातील शिष्यवृत्तीचा कोटा ठरवून देण्यात आलेला नाही. तो नंतर ठरविला जाणार आहे. मात्र, सद्य:स्थितीतील अर्जांची संख्या पाहता महाराष्ट्राशेजारच्या राज्यांमध्ये अर्जांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथील उर्वरित कोटाही महाराष्ट्राला मिळून महाराष्ट्रात जेवढे अर्ज पात्र ठरतील त्या सर्वांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींना पाच हजार रुपये तर अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
अर्ज पडताळणीच्या शेवटच्या टप्प्यात या योजनेची कार्यवाही आमच्याकडे सोपविण्यात आली. तरीही क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पडताळणी पूर्ण करण्यात आली. केंद्राकडून निवड झालेल्या विद्यार्थिनीं बँक खात्यात लवकरच शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
-दिनकर पाटील, संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, पुणे