दुबार पेरणीचे संकट : आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेतवणी : निसर्गाचा लहरीपणा व अवकृपेने वणी, मारेगाव, झरीजामणी व पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी चांगलेच हैराण झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आता त्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेत प्राप्त होत आहे.मागीलवर्षी अतिवृष्टीने या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात सापडली होती़ अखेरच्या क्षणी पाऊस आल्याने हाता-तोंडाशी आलेला ाास हिरावला गेला होता. हातातील पीक वाया गेल्याने मागीलवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाने नुकसान झाले, त्यांना शासनाकडून केवळ तुटपुंजीच मदत मिळाली़ त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. अनेकदा महसूल विभागाकडे निवेदन, तक्रारी देऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला अद्याप पदरात पडलाच नाही.मागीलवर्षीच्या धक्क्यातून कसेबसे सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने पेरणीच रखडली. ज्यांनी पेरणी केली, त्यांची पेरणी आता उलटत आहे. परिणामी त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. कोरड्या दुष्काळाने शेतातील पिके नष्ट होत आहे़ त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यातून कसे सावरावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा झाल्याने जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ त्यांनी धावपळ करून लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी केली. मात्र पेरणी झाल्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने आता पिके करपत आहेत. पेरणीचा खर्च पूर्णत: वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे़ ग्रामीण भागातील शेतकरी धार्मिक स्थळी जाऊन वरूण राजाला साकडे घालत आहे़ मात्र निसर्गाची अवकृपा कायम असल्याने शेतकरी आता धास्तावले आहेत़ पुढील वर्षात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे व घरचे मंगलकार्य पार पाडावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा
By admin | Published: July 07, 2014 12:08 AM