सुरेंद्र राऊत
यवतमाळ : पहिली पत्नी असतानाही दुस-या मुलीसोबत खोटी माहिती देऊन विवाह रचणा-या नवरोबाला दामिनी पथकाने गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. जळगाव जिल्ह्याच्या अमरनेर तालुक्यातील वावडे येथील हा नवरोबा असून त्याच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
रतीलाल नंदलाल जैन (३८) असे या नवरोबाचे नाव आहे. त्याचे सिंधू उर्फ उषाबाई शामराव भिस या महिलेसोबत २०१६ मध्ये रजिस्टर लग्न झाले होते. त्यानंतरही रतीलालने यवतमाळातील एका कुटुंबियांना खोटी माहिती सांगून दुस-या लग्नाचा डाव रचला होता. त्यापूर्वी पहिल्या पत्नीला चुकीच्या रेल्वे डब्यात बसवून पळ काढला. हा प्रकार माहीत होताच पहिल्या पत्नीने जळगाव जिल्ह्यातील मारवड पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिली. पती दुसरे लग्न यवतमाळात करीत असल्याची माहिती तिला मिळाली. तिने मारवड पोलिसांना घटनाक्रम सांगितला. मारवड पोलिसांनी यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांना याची माहिती दिली. जगताप यांनी दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांना निर्देश दिले.
दामिनी पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून माळीपु-यातील महावीर भवन येथून लग्नाच्या बेतात असलेल्या नवरोबाला ताब्यात घेतले. त्याचे समूपदेशन करण्यात आले. नव-या मुलाकडून बोहल्यावर चढण्याच्या काही मिनिटापूर्वी फसवणूक झाल्याचे नवरीच्या लक्षात आले. त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र नवरदेवाविरोधात कुठलीही तक्रार देण्याचे टाळले. अखेर दामिनी पथकाने दुस-या लग्नासाठी बोहल्यावर चढणा-या नवरोबाला समूपदेशन करून सोडून दिले. इतकेच नव्हे तर लग्नासाठी झालेला खानपानाचा खर्चही त्याच्याकडून वसूल करण्यात आला. या लग्नामुळे चांगलीच चर्चा शहरात रंगली होती. ही कारवाई दामिनी पथकातील शंकर पांडे, सुवर्णा मेश्राम, राखी मोहुर्ले, विकी राऊत यांनी केली. पुढील कारवाईसाठी नवरोबाला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.