लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. वणीची तहान भागविण्याकरिता रांगणा-भुरकी घाटावरून पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने वर्धा नदीचेही पाणी वणीकरांना लवकर मिळण्याची आशा दिसत नाही.मे ते जूनपर्यंत नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडण्यासाठी २६.३० दलघमी पाणी मिळणे अपेक्षित आहे. १५ जानेवारी २०१८ मध्ये धरणात ५१.१४ टक्के जलसाठा होता. मात्र यावर्षी या धरणाची पातळी २५०.४० मीमी असून यात २.३७ दलघमी (१९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी नवरगाव धरणातून २० दलघमी पाणी सोडण्यात आले होते. परंतु हे पाणी जॅकवेलपर्यंत अल्प प्रमाणात पोहोचले.सध्या शहरात नगरपरिषदेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास २५ ते २६ ट्युबवेलद्वारे शहरात पाणी वितरणाचे काम सुरू आहे. तसेच तालुक्यातील राजूर पिटमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे वणीकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. वणीकरांची तहान भागविण्यासाठी शहरात २१ ट्युबवेल मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने निविदा काढली असून ही निविदा २ मे रोजी उघडण्यात येणार आहे.त्यामुळे या कामाला मंजुरात मिळाल्यानंतरही १० ते १५ दिवसानंतरच या ट्युबवेलच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या ट्युबवेलचे पाणीही मे महिन्यामध्येसुद्धा वणीकरांना मिळेल की नाही, अशी शंका उत्पन्न होत आहे.कालव्यालाही पडले भगदाडमारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील धरणातून वणीकरिता कॅनलद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र या कॅनलला आता ठिकठिकाणी भगदाड पडले असून यातून पाणी बाहेर जात आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यानेही पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे वणीच्या निर्गुडा नदीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी पोहोचत नसून या कॅनलची दुरूस्ती करणे गरजेचे बनले आहे.
नवरगाव धरणाने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:29 PM
वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे.
ठळक मुद्दे१९ टक्केच जलसाठा : रांगणा-भुरकीच्या पाण्याची वणीकरांना प्रतीक्षा