लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुला-मुलीची पसंती झाली. लग्नाचा मुहूर्त ठरला. जेवणाचा मेन्यूही निश्चित केला. मनपसंद कपडे, दागिन्यांची खरेदी केली. बोलणीपेक्षा अधिक खर्च होत असला तरी वधूपित्याने मुलीच्या हौसेखातर त्याकडे कानाडोळा केला. उत्साहाने लग्नाच्या पत्रिका वाटल्या. ऐन लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलाने पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाखांची मागणी केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यवतमाळातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात राहणाऱ्या सुस्वरूप कमावत्या मुलीचा मोठ्या उत्साहात वडिलांनी पुसद येथील मुलगा रुपेश राजेंद्र नाईक (३०, रा. मंगलमूर्तीनगर) याच्याशी विवाह जुळविला. मुला-मुलीच्या पसंतीनेच वडिलांनी निर्णय घेतला. देण्याघेण्याची बोलणी झाली. त्यात मुलाला ५० हजारांचे कपडे व ३० ग्रॅम सोने मुलीच्या पित्याने देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे अमरावती येथे मुलाने ५० ऐवजी ८५ हजारांचे कपडे खरेदी केले. सोन्याचे दागिनेही ३० ग्रॅमवरून ३८ ग्रॅम घेतले. याचे रोख पैसे मुलीच्या वडिलांनी तत्काळ दिले. या दोन्ही खरेदीच्या पावत्या मुलाने स्वत:च्या नावे बनवून जवळच ठेवून घेतल्या. हा डाव वधूपित्याच्या लक्षात आला नाही. त्यांनी पत्रिका छापून नातेवाइकात वितरित केल्या. यवतमाळातील शोभिवंत अशा मंगल कार्यालयात विवाह सोहळा निश्चित केला. ११ जून रोजी हा विवाह होणार होता. मात्र, त्यापूर्वीच मुलाने ५० लाखांची मागणी करीत विवाह मोडला. यासाठी त्याला त्याचे वडील राजेंद्र श्यामराव नाईक (६०), आई पद्मिनी राजेंद्र नाईक (५७) यांच्यासह नात्यातील व्यक्ती सिद्धार्थ भगत (५०, रा. कारंजा जि. वाशिम), भीमराव उंदरे (५५, रा. पुस) यांनी लग्न तोडण्यासाठी परावृत्त केले. ऐन शेवटच्या घटकेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख मागत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपित्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ४१७, ४२०, ५००, ५०४, ३४ भादंवि व सहकलम ४ हुंडा प्रतिबंधक अधिनियम यानुसार गुन्हे दाखल केले.
परिवारासह मुलगा झाला पसार - पन्नास लाखांच्या हुंड्यासाठी शेतकरी असलेल्या वधूपित्याला लग्नाच्या चार दिवस अगोदर अश्लील शिवीगाळ केली. नंतर राजेंद्र नाईक, मुलगा रुपेश नाईक, आई पद्मिनी नाईक हे पुसद येथील घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले. त्यांनी मुलीची व तिच्या पित्याची समाजात बदनामी केली व मोठी फसवणूकही केली. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वधूपित्याची आहे.