यवतमाळ : नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. उद्घाटनाच्या वेळी त्यांचे भाषण वाचले जावी, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात आली असली तरी महामंडळाने त्यास नकार दिला आहे. असे असले तरीही संमेलनाच्या उदघाटनाच्या वेळी नयनतारा सहगल 'दिसत' आहेत.
नयनतारा सहगलांच्या अनुपस्थितीचा निषेध म्हणून रत्नागिरीतील आठ-दहा महिला नयनतारा सहगल यांच्या चेहऱ्याचा मास्क घालून संमेलनाला उपस्थित आहेत. सहगल यांचे हे 'मुखवटे' काय प्राण साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज दुपारी 4 वाजता उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. तर संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरणा ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.