विधानसभा निवडणूक : शिष्टमंडळ शरद पवारांना भेटलेयवतमाळ : लोकसभेतील पराभवानंतर किमान विधानसभा निवडणूक हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी चार मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते ना. मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले यांनी शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी आणि ते शक्य नसेल तर विधानसभेच्या यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी चार मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशी मागणी रेटली. सध्या पुसद मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. याशिवाय यवतमाळ, दिग्रस-दारव्हा आणि उमरखेड या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. या भेटीच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते ना. छगन भुजबळ, ना. आर.आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित होते. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावरून गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळानेही ना. शरद पवार यांची स्वतंत्र भेट घेऊन आपआपल्या मतदारसंघावर दावा सांगताना स्वबळावर विधानसभा लढण्याची मागणी लावून धरली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करताना यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद गेल्या पाच वर्षात कशी वाढली याचा लेखाजोखा मांडला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व अनेक स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढलेली असताना केवळ एकाच मतदारसंघावर समाधान मानावे का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढल्यास जिल्ह्यातील सातही मतदारसंघात आपली ताकद दाखवू शकतो, असा दावाही या नेत्यांनी केला. राष्ट्रवादीच्या स्वबळावर लढण्याच्या या आक्रमक भूमिका व आणखी तीन मतदारसंघांवरील दाव्याने काँग्रेसपुढील आव्हाने वाढणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा चार मतदारसंघावर दावा
By admin | Published: June 09, 2014 12:07 AM