पुसद : पुसद नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माधवी दिनकर गुल्हाने तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे डॉ.मोहम्मद नदीम यांची निवड झाली. नगरपरिषद सभागृहात झालेल्या सभेत पुसद नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे. १२ वर्षांपासून नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असून प्रथम अडीच वर्षे शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीने सत्ता प्रस्थापित केली होती. सीताबाई कांबळे यांची अडीच वर्षाची कारकीर्द संपल्यानंतर या वेळी प्रथमच कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी युती करून सत्तेत सहभागी झाली आहे. कॉंग्रेसचे गटनेते डॉ.महंमद नदीम यांची एकमताने उपाध्यक्षपदी निवड झाली. दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांच्या अध्यक्षतेत ही सभा झाली. या वेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या माधवी गुल्हाने व सेनेच्या चंदाबाई गुरुवाणी यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. माधवी गुल्हाने यांना २१ तर चंदा गुरुवाणी यांना ४ मते मिळाली. भाजपाच्या दोन नगरसेवकांनी तटस्थ भूमिका स्वीकारली. नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १२, कॉंग्रेसचे १०, सेनेचे ४, भाजपचे २ असे संख्याबळ आहे. सभेला राष्ट्रवादीच्या पुष्पा डोंगरे गैरहजर होत्या. (तालुका प्रतिनिधी)
पुसद नगरपरिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचे वर्चस्व
By admin | Published: July 20, 2014 12:11 AM