पुसद (यवतमाळ) : राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुसदचे विद्यमान आमदार मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मुलगा इंद्रनील यांचे राजकीय पुनर्वसन डोळ्यापुढे ठेऊन लवकरच त्यांचा शिवसेना प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. पुसदमध्ये नाईक घराण्याची एकहाती सत्ता राहिली आहे. पुसदने आतापर्यंत वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत.आजही पुसदमध्ये मनोहरराव नाईक राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार तर त्यांच्या पत्नी अनिताताई नगरपरिषदेच्या अध्यक्षा आहेत. मनोहरराव नाईकांचा मुलगा ययाती जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनिताताई अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीत ५० वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेच्या उमेदवाराला पाच हजार मतांची आघाडी मिळाली.मनोहरराव नाईक यांनी पुसद विभागातील राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांची शनिवारी बैठक घेतली. त्यात आपला शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. इंद्रनील नाईकांचा शिवसेना प्रवेशासाठी असलेला पुढाकार लक्षात घेता पुसदमधून आगामी विधानसभा शिवसेनेकडून तेच लढतील असे संकेत मिळत आहेत. विदर्भात मनोहरराव नाईक हे राष्टÑवादीचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. अलिकडेच नाईक परिवारातील निलय यांनी भाजपची कास धरली होती. भाजपने त्यांना विधान परिषदेची आमदारकीही दिली. युतीच्या जागा वाटपात पुसद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.राष्टÑवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतला आहे. आपल्या समर्थकांचीही त्याला भक्कम साथ आहे. संपूर्ण नाईक कुटुंबच समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहे. आमच्या दृष्टीने हा चांगला निर्णय राहणार आहे. - मनोहरराव नाईक, माजी मंत्रीआपला शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का झाला असून, मंगळवारी प्रवेश होऊ शकतो.- इंद्रनील नाईक
राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर, मंगळवारी प्रवेशाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 6:20 AM