आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळालेला नसताना राज्य शासन कर्जमाफी केल्याची ‘मी लाभार्थी’ जाहिरात करीत आहे. ही फसवाफसवी आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस येत्या नागपूर अधिवेशनावर ‘हल्लाबोल दिंडी’ काढणार आहे. त्यात राज्यभरातील त्रस्त शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.बोंडअळीच्या आक्रमणाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यवतमाळात आले होते. त्यांनी नेर आणि कळंब तालुक्यातील शेतात जाऊन कापसाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विदर्भाचा दौरा करताना या सरकारवर लोकांची नाराजी स्पष्ट दिसली. नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री वारंवार तारखा वाढवित आहेत. आतापर्यंत सहा परिपत्रके काढली. तरी अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. सरकार महिलेच्या नावावरील कर्जाला प्राधान्य देणार आहे.परंतु आपल्या राज्यात पत्नीच्या नावावर कमी तर पतीच्या नावावर जास्त कर्ज उचलले जाते. पत्नीच्या नावावर जमीन कमी असल्याने तिला मिळणारे पीककर्जही कमी असते. आता ते माफ झाले तरी शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. दुसरे म्हणजे, शेतकऱ्यांकडे पीककर्ज आणि दीर्घ मुदती कर्ज असे दोन प्रकारचे कर्ज थकीत आहे. त्यात एखाद्याकडे सहा लाख कर्ज असेल तर त्याला आधी साडेचार लाख स्वत: भरावे लागतील, तेव्हाच सरकार दीड लाखाचे कर्ज माफ करणार आहे. पण शेतकऱ्यांची तेवढी कुवत असती तर त्यांनी कर्जमाफी तरी मागितली असती का? शेतकऱ्यांच्या अशा उर्वरित साडेचार लाखांचे सरकारने बँकांकडे हप्ते पाडून मागितले आहेत. परंतु त्यासाठी बँका तयारच नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीतून कोणाचाही सातबारा कोरा होण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.कराड येथून शेतकरी दिंडी२५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी कराड येथून आम्ही शेतकरी दिंडीचा आरंभ करणार आहोत. मात्र राज्यभरातील शेतकरी एकत्र झाल्यावर १ डिसेंबरला यवतमाळ येथून शेतकऱ्यांची ‘हल्लाबोल दिंडी’ निघेल. राज्यभरातून विविध मार्गाने येणारे शेतकरी वर्धा, अमरावती येथून दिंडीला येऊन मिळणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल दिंडी धडकणार आहे.