विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. शेतकऱ्यांना उभारी देणारे लढण्यासाठी प्रवृत्त करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, असा सूर राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनात आयोजित ‘शेतकरी आत्महत्या आणि मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात निघाला. डॉ.शेषराव मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. हेच शेतकरी आत्महत्येचे खरे कारण आहे. शेतातील अतिरिक्त मनुष्यबळ शेती व्यवसायातून बाहेर पडून पूरक व्यवसाय निर्माण करणे गरजेचे आहे, असे म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीच्या दुराभिमानात अडकून न राहता बाहेर पडून उद्योगाची कास धरण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थकारणाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. ही भूमिका आता साहित्याने जोपासावी, असे डॉ. मोहिते म्हणाले. साहित्यिक सुनील यावलीकर म्हणाले, साहित्य हे माणस जोडण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कुत्सित नजरेने पाहिले जाते, हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दातृत्वामध्ये आहे. सध्या ‘खाऊजा’ संस्कृतीमुळे माणसातला माणूस कमी केला आहे. सध्या ग्राहकीकरणाचा आलेख वाढला असून तो खाली आणावा लागेल. १९४० ते १९६० च्या दरम्यान फडतूस साहित्याची निर्मिती झाल्याची टीका करताना यावलीकर म्हणाले, हिंदीमध्ये प्रेमचंद शेतकऱ्यांचे दु:ख मांडत होते. बिमल रॉय सारखे दिग्दर्शक दो बिघा जमीन या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या वेदना मांडत होते. मात्र मराठी साहित्यातून शेतकऱ्यांच्या भावभावना मांडल्या जात नव्हत्या, ही खंत आहे. शेतकऱ्यांना उभारी देणारे, लढण्याची प्रवृत्ती करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी माने म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमलेल्या डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी सरकारने लागू करणे गरजेचे आहे. तर शेतकरी आत्महत्या थांबतील. शेतकरी व उपेक्षितांच्या समस्यांवर साहित्य संमेलनात चर्चा घडून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वि.ना. कदम म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संघटनांना शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. (लोकमत चमू)
शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज
By admin | Published: January 18, 2015 10:47 PM