कळंब : शहरालगत पिंपळगाव रुई येथे कळपातून विभक्त झालेल्या नर नील गाईला गावातील श्वानांनी चावा घेऊन गंभीररीत्या जखमी केले. त्या नील गायीला वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲण्ड रिसर्चच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले.
श्वानांपासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी जखमी नील गाईने पळ काढला. त्यात ती खड्ड्यात पडली. त्यामुळे तिच्या मागील पायांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲण्ड रिसर्च संस्थेचे रेस्क्यूअर अब्दुल कलाम यांना मिळाली. त्यांनी चमू सोबत घटनास्थळ गाठले. अथक परिश्रमानंतर नील गाईला खड्ड्यातून काढण्यात त्यांना यश आले.
संस्थेचे रेस्क्यूचे स्वेतल लांडगे, अब्दुल कलाम, रिंकू लांडगे, सय्यद तोशिफ यांनी तत्काळ नील गायीवर प्रथमोपचार करून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे ललित उपाध्याय यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी नील गाईला पुढील उपचारासाठी करुणा आश्रम वर्धा येथे दाखल केले. या कार्यात अजय वर्मा, निखिल राऊत, प्रमोद जिरापुरे आणि वनविभागाचे अधिकारी शंकर मडावी यांचे सहकार्य लाभले.