यवतमाळ : आत्याने तिची शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी भाच्यांकडे दिली. मात्र, त्या जमिनीवर भाच्यांनी आत्याच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. हा प्रकार माहित झाल्यानंतर आत्याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कौटुंबिक नात्यातील गोडवा हा विश्वासावरच टिकलेला असतो. त्यात अविश्वासाचा खडा पडला की, जवळची व्यक्ती दुरावते. असाच प्रकार घाटंजी तालुक्यातील मुरली येथे घडला असून भाच्यांनीच आत्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
सीमा रमेश राऊत (रा. पद्मावती पार्क, लोहारा) यांची शेती मुरली शिवारात आहे. नात्यातील भावांच्या मुलाकडे ही जमीन देखभालीसाठी दिली. शेतजमीन असल्याने घाटी, घाटंजी येथील सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेत सीमा राऊत यांनी खाते उघडले. त्याचा व्यवहारही भाच्यांकडे सोपविला. मात्र या खात्यातून एप्रिल २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत पीक कर्जाची उचल करण्यात आली. विविध व्यक्तींच्या नावाने हे कर्ज घेण्यात आले.
संदीप जमदापुरे, सचिन जमदापुरे, महेश भोयर, निखिल भोयर सर्व रा. मुरली अशी त्यांची नावे आहे. या सर्वांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यातील निखिल भोयर हा घाटंजी बॅंकेत वाॅच म्हणून काम करीत होता. त्यांच्याही नावाने १ लाख २२ हजार ७०० रुपयांची रक्कम उचलण्यात आली. हा प्रकार माहीत झाल्यानंतर सीमा राऊत यांनी याची तक्रार दिली. घाटंजी पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व त्यानंतर विभागीय पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडेही तक्रार केली.
कौटुंबिक वादात गोवली जातेय बॅंक
या प्रकरण संदर्भात घाटंजी मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापक प्रमोद हेमके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यात बॅंकेकडून कुठलीही अनियमितता झाली नसल्याचे स्पष्ट केले. २०१८ पासून सदर महिलेच्या खात्यातून पीक कर्जाची उचल होत आहे. व त्याची नियमित परतफेड ही केली जात आहे. कौटुंबिक वाद झाल्यानंतर बॅंकेला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्या व भाच्यात शेतीचा वाद सुरू आहे, असे हेमके यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.