जवळा (यवतमाळ) : काकाचा मृतदेह ठेवून असलेल्या शीतशवपेटीचा शॉक लागून पुतण्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास जवळा (ता. आर्णी) येथे घडली. गणेश गुल्हाने (५७), असे मृत पुतण्याचे नाव आहे.
जवळा येथील माजी सरपंच प्रभाकरराव गुल्हाने (८०) यांचे बुधवारी (१४ ऑगस्ट) दुपारी ३ वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याने मृतदेह ठेवण्याकरिता आर्णी येथून शीतशवपेटी आणण्यात आली. प्रभाकरराव गुल्हाने यांचा मृतदेह ठेवून शवपेटी सुरू करण्यात आली.
वीज प्रवाह संचारला असलेल्या शीतशवपेटीला गणेश गुल्हाने यांचा धक्का लागला. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ व आप्त परिवार आहे.