लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेला नेर तालुका यंदा दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेर तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावे, या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने नेर तहसीलच्या प्रांगणात काळी दिवाळी हे अभिनव आंदोलन करण्यात आले.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या आंदोलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यंदा नेर तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिके पुरती नष्ट झाली आहेत. असे असतानाही नेर तालुक्याची आणेवारी पन्नास पैशाच्या वर दाखविण्यात आली आहे. एकीकडे जादा आणेवारी दाखवायची, पर्जन्यमानाचा बागुलबुवा उभा करायचा आणि त्यानंतर दुष्काळग्रस्तांच्या यादीतून तालुकाच हद्दपार करायचा. यामुळे नेर तालुक्यातील शेतकºयांच्या जखमेवर पुन्हा एकदा शासन व प्रशासनाने मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांच्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने काळी दिवाळी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आपल्या भाषणातून तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविला.आंदोलनाचा अंतिम टप्प्यात नायब तहसीलदार संजय भोयर यांना आंदोलकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलच्या प्रांगणात दिवे लावून शेतकऱ्यांची एक अभिनव अशी दिवाळी प्रशासनाच्या दारात साजरी करण्यात आली. यापूर्वी ११ नोव्हेंबर २०१५ ला सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन नेर तहसीलच्या प्रांगणात करण्यात आले होते.आंदोलनात गजानन अमदाबादकर, नितीन देशमुख, पिंटू पाटील खोडे, बबन चौधरी, चंद्रशेखर देशमुख ,हिम्मतराव देशमुख, मोहन भोयर, सदानंद पेचे, सचिन भाकरे, गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, नीलेश चौधरी, दिनेश चौधरी, नितीन भोकरे, श्रीकांत ठाकरे, अनिल चव्हाण, दिनेश चव्हाण, सागर तिमाने, विजेंद्र पाटमास, जीवन जयस्वाल, श्रेनिक सिंगवी, निखिल ठाकरे, स्वप्निल शेटे, मिथुन मोंढे, मिलन राठोड, रवी गावंडे आदी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यामागील वर्षी भरून घेतलेला आॅफलाईन विमा स्वीकारून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, नाफेडचे हमीभाव केंद्र तत्काळ सुरू करावे, शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावा, नेर तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावा, मागेल त्याला रोजगार हमीचे काम उपलब्ध करून द्यावे.
नेरच्या शेतकऱ्यांची दिवाळी तहसीलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 9:46 PM