नेर : शहरासह तालुक्यात जनावरे चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. मागील काही दिवसात वाढलेल्या घटनांवरून ही बाब स्पष्ट होते. विशेष म्हणजे वाहनाद्वारे चोरी केलेल्या जनावरांची वाहतूक केली जात आहे.तालुक्याच्या सातेफळ येथे ५० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरट्यांनी लांबविली. व्याहाळी येथेही असाच प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. बैल चोरून नेत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. सातेफळ येथील गजानन बिबे यांच्या गोठ्यातील बैलजोडी सोमवारी रात्री चोरट्यांनी लांबविली. व्याहाळी येथील प्रमोद भिवरकर यांची बैलजोडी चोरीचा प्रयत्न झाला. एका नागरिकास जाग आल्याने त्याने आरडाओरड केली. चारचाकी मालवाहू वाहन घेऊन आलेले हे चोरटे पसार झाले. बैल चोरीची तक्रार देण्यासाठी गजानन बिबे हे पोलिसात गेले असता त्यांना ‘शोध घ्या’ असा सल्ला देण्यात आला. महागडी जनावरे चोरी जात असल्याने पशुधनपालकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. पोलीसही याविषयी गंभीर नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
नेरमध्ये जनावरे चोरट्यांची टोळी सक्रिय
By admin | Published: August 24, 2016 1:04 AM