आज पहिली घंटा : जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सवासोबतच पुस्तकदिनलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळी सुटी संपून २७ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे शाळेचा पहिला दिवस समारंभपूर्वक साजरा होणार असला तरी यंदा सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच विविध उपक्रमांचा धडाका शिक्षण विभाग लावणार आहे. जिल्हा परिषद शाळांच्या नव्या सत्राला मंगळवारी प्रारंभ होत आहे. पहिल्याच दिवशी गावात प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांना वाजत-गाजत शाळेत आणण्यासाठी शिक्षक मंडळी सोमवारी सायंकाळीच शाळेच्या गावात रवाना झाले. यंदा विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ करतानाच पुस्तकदिन साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुस्तकांचे नियोजन करण्यासाठी शिक्षकांनी खबरदारी घेतली आहे. सरपंच, ग्रामसेवक अशा मान्यवरांना शाळेत बोलावून त्यांच्या हस्ते पुस्तक वाटप केले जाणार आहे. तंबाखूमुक्त अभियानाचा प्रतिसाद नव्या सत्रातही कायम राहावा, यासाठी यंदा पहिल्या दिवसापासूनच शाळेमध्ये तंबाखूमुक्त जीवन शपथ घ्यावी लागणार आहे. ही शपथ दररोजच्या परिपाठात घेण्याचे आदेश शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिले आहेत. त्यासोबतच नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीच्या सभेतील चर्चेनुसार, प्रत्येक शाळेला आपले वेळापत्रक दर्शनी भागात लावण्याचे आदेश आहेत. शिवाय राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेला तक्रार पेटी लावणे बंधनकारक झाले आहे. नव्या सत्रात अशा उपक्रमांचा धडाका असतानाच शाळासिद्धीच्या बाह्यमूल्यांकनाचाही सपाटा सुरू होणार आहे. तर नव्या सत्रापासून गणित आणि मराठी भाषेसोबतच आता इंग्रजीसाठीही पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शिक्षकांना अनेक नव्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे.शिक्षकांना मात्र नव्या शाळेचे वेधनव्या सत्रात विद्यार्थी नव्या उत्साहात शाळेत येत आहेत. मात्र हा उत्साह बहुतांश शिक्षकांमध्ये दिसत नाही. संपूर्ण उन्हाळी सुटीत बदल्या होणार का, या एकाच संभ्रमात गुंतलेल्या शिक्षकांच्या बदल्या अद्यापही झालेल्या नाहीत. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाने सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्यामुळे बदल्या होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नव्या उपक्रमांसोबतच शिक्षकांना नव्या शाळेचे वेध लागले आहे.नवे गणवेश तयार, पण पैसेच नाहीशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहेत. मात्र, गणवेशाचा निधीच पोहोचलेला नाही. दरवर्षी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कंत्राट घेणाऱ्या टेलर मंडळींनी यंदाही लाखो रुपयांचा कापड आणून गणवेश शिवून तयार ठेवले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांच्या खात्यात ४०० रुपये टाकण्यासाठी मुख्याध्यापकांपर्यंत निधी आलेला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच शाळेत जावे लागणार आहे.
नव्या शैक्षणिक सत्रात नव्या उपक्रमांचा भडीमार
By admin | Published: June 27, 2017 1:25 AM