नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आता नवीन प्रयोग करण्यात येत आहे. यासाठी नागपूरच्या महाराज बागेतील एका वाघिणीचे मूत्र आणण्यात आले असून नरभक्षक वाघिणीचा वावर असणाऱ्या भागात हे मूत्र फवारण्यात येत आहे. या मुत्राच्या उग्र वासामुळे ही नरभक्षक वाघीण झाडाझुडूपातून बाहेर येईल व तिला तातडीने जेरबंद करण्यात यश येईल, असा विश्वास शोध पथकाने व्यक्त केला आहे.गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाने टी-१ वाघिणीला पकडण्याचे जेवढे प्रयत्न केले, ते सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. मध्यप्रदेशातून चार हत्ती आणले. परंतु ते हत्तीही उधळले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केले. पाच शार्पशुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचाऱ्यांची फौज एवढेच नाही तर वाघिणीचा हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर, इटालीयन कुत्रे आणण्यात आले होते. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. या शोध मोहिमेत लाखो रूपयांचा चुराडा झाला. परंतु नरभक्षक वाघीण हाती लागली नाही. एकटी वाघीण सर्वांनाच भारी पडली. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली. खासगी शिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.आता वनविभागाने १४ जणांचे बळी घेणाऱ्या या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नवीन प्रयोग सुरू केला आहे. दुसऱ्या वाघिणीच्या मुत्राच्या उग्र वासामुळे वाघीण कुठेही झाडाझुडूपात लपून असली तरी ती बाहेर येते, अशी माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे नागपूरच्या महाराज बागेतील वाघिणीचे मूत्र आणण्यात आले असून ते मूत्र नरभक्षक वाघिणीचे वास्तव्य असणाऱ्या संभाव्य कक्ष क्रमांक ६५२ मध्ये फवारण्यात आले.मूत्र फवारल्यानंतर याच कक्षातील ट्रॅप कॅमेऱ्यात वाघीण कैद झाली असून तिचे पगमार्कही आढळून आले आहेत. त्यामुळे शोधपथकाच्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याही काळात थंडावलेल्या या शोधमोहिमेला गती आली आहे. नवा प्रयोग यशस्वी होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहशतीमुळे शेतातील कामे पडली ठप्पपांढरकवडा वनविभागातील राळेगाव व पांढरकवडा वनपरीक्षेत्रात नरभक्षक वाघिणीची दहशत अद्यापही कायम असून जंगलाशेजारी असणाऱ्या शेतातील कामे ठप्प झाली आहे. सोयाबीनचे व कपाशीचे पीक शेतात असूनही ते काढण्यासाठी शेतात जायला कुणीही तयार नाही. गावातील मजुरांना मजुरी मिळत नसल्यामुळे काही मजुरांनी गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावाकडे धाव घेतली आहे. लोणी, सराटी, बोराटी, भुलगड, खैरगाव, विहिरगाव, येडशी, तेजणी, जिरा, मिरा, सखी, झोटींगधरा, तेजनी आदी गावांमध्ये या नरभक्षक वाघिणीची चांगलीच दहशत आहे.