चालण्याचा वेग वाढला : वाघाने कापले २०० किलोमीटरचे अंतर गणेश वासनिक अमरावतीव्याघ्र प्रकल्पांमध्येच वाघांचे अस्तित्व, अधिवास असल्याचा समज आता वाघांनी मोडून काढला आहे. अनेक व्याघ्र प्रकल्पांमधून शेकडो किलोमीटरचा पल्ला गाठून ते नवा घरोबा शोधत असल्याने ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. तसेच वाघांच्या चालण्याचा वेग वाढल्याने हा संशोधनाचा विषय ठरला आहे.देशात ४९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २० टक्के व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ८० टक्क्यांच्या घरात आहे. यात राज्यातील पेंच, ताडोबा, नवेगाब बांध, नागझिरा, मेळघाट तर मध्यप्रदेशातील कान्हा, पन्ना, पेंच आसामातील मानस, वाल्मिकी, राजस्थानच्या रणथंबोर या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी जागा अपुरी पडत असल्याने स्थलांतरणाच्या घटना निदर्शनास येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने देशभरातील व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांना सूक्ष्म लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. राज्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ मेळघाटपेक्षाही कमी असले तरी ताडोबातून वाघांचे स्थलांतर अधिक प्रमाणात होते. ताडोब्यातून गडचिरोली, मध्यप्रदेश, तेलंगणाच्या सीमा ओलांडून वाघ स्थलांतर करीत आहेत.२०१० मध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्पातून एका वाघाने २०० कि.मी.चे अंतर ओलांडून मध्यप्रदेशातील पेंचमध्ये विसावा घेतला होता तर १५० किलोमीटर प्रवास करून कळमेश्वरचा वाघ पोहरा, चिरोडी जंगलात रमला आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघ अदिलाबाद, आंध्रप्रदेश, तेलंगणापर्यंत ये-जा करीत असल्याचा अहवाल वन्यजीव विभागाने राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाला दिला आहे. मध्यप्रदेशातील पेंच, कान्हा व पन्नामधील वाघ छिंदवाडा, शिवनी भागात रमले आहेत. परिणामी व्याघ्रांचे स्थलांतरण का वाढले, याचा शोध घेणे गरजेचे ठरणार आहे. स्थलांतरित वाघांना त्यांच्या घरी सोडणार कसे?स्थलांतरित वाघांना पुन्हा त्याच व्याघ्र प्रकल्पात सोडण्याबाबतचे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे आदेश आहेत. मात्र स्थलांतरित वाघ कसे, कोठे शोधावेत, हा प्रश्न व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांसमोर निर्माण झाला आहे. स्थलांतरित वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना पकडण्याची नवी समस्या निर्माण झाली आहे. वाघ हा जंगलाचा राजा आहे. त्याने कोठे जावे, कोठे अधिवास करावा, हे वनविभाग ठरवू शकत नाही. मात्र, स्थलांतरित वाघ असेल तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर येते. त्यामुळे पोहरा, चिरोडी जंगलात कळमेश्वर येथील स्थलांतरित वाघांच्या संरक्षणासाठी वनविभागाची चमू सज्ज झाली आहे.-हेमंत मीणा,उपवनसंरक्षक, अमरावती.
वाघांच्या स्थलांतरणाची नवी समस्या
By admin | Published: February 03, 2017 2:08 AM