जब्बार चीनी लोकमत न्यूज नेटवर्क वणी : पीएम किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी २०१९पूर्वी जमीन खरेदी केली असेल, तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच पीएम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी, मुलांचे आधार जोडावे लागणार आहे. सातबारावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे.
शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनाने २०१९मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून, राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९पूर्वी जमीन नोंद असेल, तर १८ वर्षांवरील मुलांना लाभ घेता येतो. पण, काही पती-पत्नी व २०१९नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल, तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल, त्या पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल, तर अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.