यवतमाळ : कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशिकांची वाढ रोखण्यावर गुणकारी ठरणारे ‘बिटा कॅरोटिन’ हे औषधी द्रव्य गाजराच्या रसातून अधिक प्रभावीपणे संकलित करण्याचे नवे तंत्रज्ञान येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील (जेडीआयईटी) रसायनशास्त्राच्या दोन अध्यापकांनी विकसित केले आहे. या संशोधनास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २९ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. या नवीन यंत्रणेमुळे कर्करुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.येथील जेडीआयईटीतील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अजय पारडे आणि प्रा. डॉ. प्रशांत तायडे यांनी संयुक्तरित्या हे संशोधन केले. आवश्यक स्वरुपात बिटा-केरोटीन संकलन व वृद्धीकरण करण्याची नवीन यंत्रणा प्रायोगिक तत्वावर शोधून काढली आहे. ही यंत्रणा राष्ट्रीय स्तरावर वृद्धींगत करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाºया नवी दिल्ली येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात (डीएसटी) सादर करण्यात आली.तेथील अभ्यागत मंडळापुढे सादरीकरण केल्यानंतर मंडळाने संशोधनातून होणारे सामाजिकव आर्थिक फायदे बघता या संशोधनास २९ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य व दोन वर्ष संशोधन काळ त्वरित मंजूर करून दिला. अशा प्रकल्पांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन संस्थेचे सचिव किशोर दर्डा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी दिले. केमिकल विभागाच्या व महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपलब्धीबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा यांनी कौतुक केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा यांनी या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीकरिता आशीर्वाद दिले.सध्याच्या औषधीमध्ये बिटा कॅरोटिनची कमतरताकर्करुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त अशी बिटा-कॅरोटीन ही औषधी गाजरातील रसामध्ये उपलब्ध असते. ही औषधी कर्करोगास कारणीभूत पेशिका वाढीला परावृत्त करते. बाजारात उपलब्ध असलेल्या कॅरोटीन औषधी सध्या ज्या पद्धतीने बनविण्यात येतात, त्यात बिटा-केरोटीन ज्या स्वरुपात आवश्यक असते, त्या स्वरुपात मिळत नाही. त्यामुळे त्या आवश्यक प्रमाणात प्रभावी ठरत नाही. या कारणामुळे रुग्णांचा औषधांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.
गाजरातून ‘बिटा कॅरोटिन’ मिळविण्याचे नवे तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 4:34 AM