वेतनास विलंब : आता गटशिक्षणाधिकाऱ्यांना तंबीयवतमाळ : दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच शिक्षकांचे वेतन अदा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे. त्यावर अंमल करण्यासाठी जिल्ह्याचा शिक्षण विभाग कसोशीचे प्रयत्न करीत असला तरी वेतनविलंबाचा अध्याय अजूनही संपलेलाच नाही. निदान नवीन वर्षाच्या १ तारखेला तरी चांगला श्रीगणेशा होण्याची शिक्षकांना अपेक्षा असताना जानेवारीचा पहिला आठवडाही रिकाम्या खिशानेच गेला.शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनास प्रचंड विलंब होत असल्याने राज्य शासनाने याबाबत गंभीर दखल घेतली होती. गेल्या आॅगस्टमध्ये शासन निर्णय निर्गमित करून वेतन एक तारखेलाच करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दसऱ्याच्या सुमारास जिल्हा कोषागार आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून वेळेवर वेतन अदा केले. मात्र, त्यानंतर पुन्हा गाडी ढेपाळली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शालार्थ प्रणालीतील वेतन बिले तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या ‘लॉगीन’ला सादर करण्यात आली नाही. चालू महिन्याचे वेतन पुढच्या एक तारखेला अदा होण्यासाठी वेतन बिले १० तारखेपर्यंत सादर होण्याची गरज आहे. मात्र, ही तारीख पाळण्याकडे दुर्लक्ष होत आहे.निदान नव्या वर्षाच्या सुरवातीला म्हणजे १ जानेवारीलाच वेतन देऊन वरिष्ठ सुखद धक्का देतील, अशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आशा होती. पण गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून १० डिसेंबरपर्यंत वेतनबिले ‘ईओ’ लॉगीनला पाठविण्यात न आल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पगार अदा होऊ शकले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबीची गांभीर्याने दखल घेतली असून १० तारखेची डेडलाईन पाळण्याविषयी गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी तंबी दिली आहे. जानेवारीचे वेतन १ फेब्रुवारीला अदा होण्यासाठी १० जानेवारीपर्यंतच बिल ‘ईओ’ लॉगीनला सादर करण्याचे पत्र देण्यात आले आहे. ही मर्याद न पाळल्यास आणि वेतनास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी यापुढे गटशिक्षणाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येईल, अशी नोटीस सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. ही नोटीस मिळताच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शालार्थवरच सर्व लक्ष ‘फोकस’ केले आणि अवघ्या दोन-तीन दिवसांतच बिले ‘रेडी’ केली. मात्र, शनिवारपासून म्हणजे ९ तारखेपासून शालार्थची वेबसाईटच बंद असल्याने तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. ११ जानेवारीपर्यंत ही अडचण कायमच होती. त्यामुळे दहा तारखेची डेडलाईन हुकली. जानेवारीचे वेतन १ फेब्रुवारीलाच अदा होण्याचा मार्ग पुन्हा कठीणच बनला आहे. दरम्यान, १२ जानेवारीपर्यंत वेतनबिलाचे संपूर्ण काम आटोपून यावेळी १ तारखेलाच वेतन अदा करण्याचे पूर्ण प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
साल नवे; पण हाल जुनेच
By admin | Published: January 11, 2016 2:16 AM