यवतमाळ : लोकसभेपाठोपाठ विधानसभेत भूईसपाट झालेल्या काँग्रेस पक्षाने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सहकारातील निवडणुका हे आपले पुढील लक्ष्य निश्चित केले आहे. जिल्हा काँगे्रसच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे, माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रफुल्ल मानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच बैठक असल्याने वादळी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ती बैठक राजकीयदृष्ट्या फुसका बार ठरली. या बैठकीत विधानसभा निवडणूक, त्यातील पराभव, अस्तित्वात नसलेली जिल्हा कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष फेरबदल यापैकी एकाही मुद्यावर कुणी ब्र काढला नाही. विधानसभेतील पराभवाचे साधे सावटही या बैठकीवर दिसून आले नाही. नेत्यांनीही त्या विषयाला हात घातला नाही किंवा कार्यकर्त्यांनीही जाब विचारण्याच्या भानगडीत न पडणे टाळले. केवळ सहकार आणि या क्षेत्रात होऊ घातलेल्या निवडणुका एवढ्याच मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली.जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहकारातील अन्य संस्थांमध्ये निवडणुका होऊ घातल्या असल्याबाबत तसेच सहकार कायद्यात बैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार झालेल्या फेरबदलाची माहिती यावेळी देण्यात आली. आधी सेवा सोसायट्या आणि नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मार्गदर्शन व आढावा समिती स्थापन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. एकूणच जिल्हा बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळाच्या निवडणुकीत आतापर्यंत सहकार या दृष्टीने पाहिले जात होते. बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. परंतु यावेळी पहिल्यांदाच काँग्रेस राजकीय पक्ष म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. सर्व २१ जागांवर काँग्रेस उमेदवार उभे करण्याची तयारी दिसू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँक काँग्रेसचे पुढचे लक्ष्य
By admin | Published: November 03, 2014 11:32 PM