सुरेंद्र राऊत
यवतमाळ : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जम्बो पदभरती प्रक्रिया हाती घेतली आहे. ही प्रक्रिया परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीच्या एकूणच कारभारामुळे वादग्रस्त ठरली आहे. गट क संवर्गाचा पेपर २४ ऑक्टोबरला झाला; तर गट ड संवर्गाचा पेपर होऊ घातला आहे. त्यापूर्वीच घोडेबाजार सुरू झाला असून त्याचे केंद्र यवतमाळात असल्याचे पुढे येत आहे.
गट क संवर्गातील २७२५ जागांसाठी आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६१९१ जागांकरिता भरती प्रक्रिया घेतली जात आहे. आरोग्य विभागाचे राज्यात सहा उपविभाग असून अकोला, नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील जिल्हानिहाय रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच अनेक आक्षेप घेण्यात आले. पहिल्यांदा आयाेजन केलेली परीक्षेची तारीख ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की ओढवली. आता या पदभरतीचे दरच जाहीर झाले आहेत. गट क संवर्गासाठी २५ लाख रुपयांची डिमांड दलालांकडून केली जात आहे. त्यातही उमेदवाराला विश्वास वाटावा म्हणून पाच लाख रोख, मूळ कागदपत्र, हॉल तिकीट आणि दोन कोरे चेक मागितले जात आहेत. समोरच्या उमेदवाराला चेकद्वारे उर्वरित रक्कम द्यायची असल्याने आपली निवड होणार, असा विश्वास देण्याचा प्रयत्न दलालांकडून केला जात आहे.
गट ड संवर्गासाठीची परीक्षा ३१ ऑक्टाेबरला होणार आहे. त्याचाही घोडेबाजार उघडला असून २० लाख रुपये मागितले जात आहेत. त्यासाठीसुद्धा पाच लाख रोख, मूळ कागदपत्र, हॉल तिकीट आणि एक पाच लाखांचा धनादेश व एक दहा लाखांचा धनादेश अशी डिमांड केली जाते. आतापर्यंत अशा अनेकांच्या सेटिंग लावण्यात आल्या आहेत. परीक्षार्थ्यांमध्ये या घोडेबाजाराची उघडउघड चर्चा होत आहे. त्यानंतरही आरोग्य विभागाची यंत्रणा यात लक्ष घालायला तयार नाही. आपली सेटिंग बिचकू नये म्हणून झालेला व्यवहार कुणामार्फत करण्यात येतो हे सांगण्यास कुणीच तयार नाही. यामुळेच दलालांचे सध्या फावत आहे.
यवतमाळच्या स्टेट बँक चौकातील बुक स्टॉल चर्चेत
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात असलेला बुक स्टॉल चर्चेत आला आहे. या ठिकाणी जाऊन अनेकांनी टोकन रक्कम देत आपल्या नोकरीसाठी बुकिंग केले आहे. हा व्यवहार राजरोसपणे सुरू आहे. येथील व्यक्ती त्यांचे भाऊजी मुंबईत मंत्रालयात उच्च पदावर असल्याची बतावणी करीत आहे. त्यासाठी उमेदवाराचा विश्वास संपादन करण्याकरिता बाेलणीही करून दिली जाते. सध्या हा घोडेबाजार चांगलाच तेजीत आहे.