यवतमाळ : राष्ट्रीय तपास यंत्रणेला देशांतर्गत चालणारे बनावट नोटांचे रॅकेट हाती लागले. यातील काही धागेदोरे यवतमाळात असल्याचा संशय आहे. त्यावरून मुंबई येथील एनआयएच्या पथकाने शनिवारी पहाटे ४ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे धाड टाकली. तेथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. काही महत्वाचा पुरावाही एनआयए पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.
एनआयएच्या दिल्ली कार्यालयातून देशभर बनावट नोटा विरोधात धाडसत्र राबविण्यात आले. चार राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. महाराष्ट्रातील कोल्हापूर व यवतमाळ दोन जिल्ह्यात धाडी घालण्यात आल्या. यवतमाळातील आर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ब्राम्हणवाडा येथे शनिवारी पहाटे मुंबई एनआयएचे पथक धडकले. यावेळी आर्णी पोलिसांची चमू त्यांच्या मदतीला होती. ब्राम्हणवाडा येथून उत्तम भीमराव चव्हाण याला ताब्यात घेतले. यासोबतच कोल्हापूरमध्ये धाड टाकून संशयित राहुल तानाजी पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच उत्तरप्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यातून विवेक ठाकूर, आदित्य सिंग, बल्लारी जिल्ह्यातील महेंद्र यांनाही ताब्यात घेतले आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून १००, ५००, २०० अशा बनावट चलनी नोटा तयार करून त्याचे देशांतर्गत वितरण केले जात होते, असा आरोप आहे. त्यावरूनच ही कारवाई करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा येथे केलेल्या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र पथकाच्या धाडीत नेमके काय हाती लागले याबाबत बोलण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी टाळले. निवडणूक असलेल्या राज्यात वितरण केल्याचा संशय
छत्तीसगड, तेलंगणा या निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये बनावट नोटांचे वितरण केल्याचा संशय आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी देशाच्या सीमावर्ती राज्यातून साहित्य आणले जात होते. व त्याचा वापर केला जात होता. यवतमाळ जिल्ह्यातील संशयित उत्तम हा इतर साथीदारांच्या मदतीने भारतभर या बनावट नोटा पुरविण्याचे काम करीत असल्याचा संशय आहे. त्यातूनच ही कारवाई सुरू आहे.