लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काळ बदलला. काळासाेबत विविध उपकरणेही बदलली. याचा परिणाम माणसांच्या स्मरणशक्तीवर झाला. याचा रिऍलिटी चेक ‘लोकमत’ने केला. त्यासाठी काही चाैक आणि काही व्यक्तींशी संपर्क साधला, तर अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ नव्हता, तर काही पत्नींना आपल्या पतीदेवाचा नंबरही पाठ नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा नंबर पाठ आहे.
मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकाॅल मेमरीचा वापर करीत नाहीत. यामुळे असा प्रकार घडतो, असे ते म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला. परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाईल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. यासाठी प्रत्येकाने दररोज रिकाॅल मेमरीचा वापर केला पाहिजे. अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच
- मोबाईल आल्यापासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण नंबरच्या बाबतीत परावलंबी झाले आहेत.
- पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेस प्रत्येकांना कुटुंबातील सदस्यांसह काही व्यक्तींचे नंबर तोंडपाठ असायचे.
- आता नाव आठवल्यानंतर मोबाईलच्या मेमरी बाॅक्समध्ये जाऊन नंबर काढले जातात. यातून रिकाॅल मेमरी कमी होत आहे. यामुळे अनेकांना पाठ राहणारे नंबर मोबाईल पाहिल्याशिवाय सापडत नाही.
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
प्रत्येक पालकाने आपला मुलगा कुठे विसरला तर त्याला घरी परत येता यावे, म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला. यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर मूकपाठ आहे. त्यामुळे तो मोबाईल न घेता नंबर सांगू शकतो.
- आदर्श
मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव आणि आई-बाबांचा मोबाईल नंबर पाठ आहे. हातातमोबाईल न घेता मला तो नंबर सांगता येतो. यामुळे कधी नंबर हरविला तर मला विचारले जाते आणि मी सहज नंबर सांगतो.
- नावीन्य
पोरांना आठवते, मोठ्यांना का नाही?
लहान मुलांना आपण वारंवार सांगून नंबर पाठ करून घेतो. यामुळे शाॅर्ट मेमरी लाँग टर्म मेमरीमध्ये परिवर्तित होऊन नंबर लक्षात राहतो. मोबाईलमुळे मोठे व्यक्ती परावलंबी होऊन शाॅर्ट मेमरीचा वापर करीत नाही.
- डाॅ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ