प्राधिकरणाचे दुर्लक्ष : यशोधरानगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारायवतमाळ : येथील जुना उमरसरा परिसरातील यशोधरानगरात गत दहा दिवसांपासून जीवन प्राधिकरणाकडून नळच सोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.२० ते २५ घरांची वस्ती असलेल्या या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नियमितपणे एक दिवस आड संध्याकाळी सहाच्या सुमारास नळ येतात. गेल्या वर्षभरापासून रात्री बारानंतर कधीतरी नळ सोडण्यात येतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वर्षभरही रात्र जागून काढावी लागते. याबाबत वारंवार प्राधिकरणाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु गांभिर्याने दखलच घेतल्या जात नाही. आता तर दहा दिवसांपासून नळाला पाणीच येत नाही. उल्लेखनिय म्हणजे या ठिकाणी प्राधिकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. बोअरवेलला पाणी लागत नाही त्यामुळे बोअरवेल करून फायदा नाही. याच कारणामुळे हातपंपही नाही. उमरसरा ग्रामपंचायतची यशोधरानगराला लागून असलेल्या निखिलनगरात स्वतंत्र नळ योजना आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतकडे या बाबत साकडे घातले होते. ग्रामपंचायतसुद्धा लोकवर्गणीतून नळ योजना या भागात टाकून देण्यास तयार झाली होती. परंतु ग्रामपंचायत नगर परिषदेत गेली आणि सर्वकाही खोळंबल. प्राधिकरणाकडून पाणी देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसताना देयके मात्र नियमित पाठविली जातात, पाणीच मिळत नसलेल्या नळाचे बिलही नागरिक भरतात. या तीव्र अशा पाणीटंचाईबाबत प्राधिकरणाचे उपअभियंता शेषराव दारव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता उंचावर असल्यामुळे पाणी या भागात चढत नसल्याचे ते म्हणाले, वास्तविक एक वर्षापूर्वी या ठिकाणी प्राधिकरणाच्या नळाला भरमसाठ पाणी होते. नळ जोडण्या वाढल्यामुळे पाणी मिळत नसल्याचेही दारव्हेकर सांगतात. वर्षभरात या भागात केवळ दोन ते तीन नळजोडण्या वाढल्या असतील. त्यामुळे प्राधिकरणाकडून देण्यात येत असलेल्या स्पष्टीकरणाबाबत नागरिकांमध्ये चिड निर्माण होणे सहाजिक आहे. परिस्थिती अशीच कायम राहल्यास पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
१० दिवसांपासून नळच नाही
By admin | Published: March 17, 2016 3:03 AM