कोठारी ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व सदस्यांनी विकासकामात भ्रष्टाचार केला. त्याची सखोल चौकशी होईपर्यंत उपसरपंच पदाचा स्वीकार करणार नसल्याचा निर्धार उपसरपंच अर्जुन राठोड यांनी केला. ग्रामपंचायत सदस्य राम धर्मा राठोड, राहुल अढागळे, परमेश्वर जाधव, रेणुका राठोड यांनीही तसाच निर्धार व्यक्त केला. कोठारी येथे २०१५ ते २०२० या कालावधीत १३ व्या वित्त आयोग, १४ व्या वित्त आयोग व ग्रामपंचायतीचा इतर प्राप्त निधी कोणत्या कामावर खर्च केला, असा प्रश्न आहे.
तत्कालीन सरपंच, सचिवांनी जी कामे केली, ती कामे निकृष्ट दर्जाची व बोगस आहेत. नवीन विहीर खोदकाम, बांधकाम, खोलीकरण, पाइपलाइन, सिमेंट नाली, रपटे, तांडा सुधार योजनेतील रस्ते व दुरुस्तीचे काम, शौचालय, जि.प. शाळेचे किचन शेड, सौर पथदिवे अशा अनेक कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नवनिर्वाचित सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत आम्ही पदभार स्वीकारणार नाही, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले.