लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काैटुंबिक जबाबदारी खांद्यावर आलेल्या काळातच स्वेच्छासेवानिवृत्तीचे अर्ज भरून घेण्याची मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. पोरीचे लग्न, पोराचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांचे आजारपण या सर्व जबाबदाऱ्या याच काळात पूर्ण कराव्या लागतात. शिवाय, तातडीच्या कामानिमित्त काढलेले कर्जही भरावे लागते. सेवानिवृत्त झाल्यानंतर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या कशा, या प्रश्नाने आतापासूनच भंडावून सोडले आहे. सेवानिवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचे काम हाताला मिळणार नाही. डोक्यावर असलेले कर्ज मिळणाऱ्या पैशातून महामंडळ कापून घेणार, वर्षभरात केवळ तीन महिन्यांचा पगार मिळेल. एवढ्या तोकड्या पैशात काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे शक्य होत नाही. एकरकमी पैसा मिळाला, तरी तो कार्यप्रसंग, शिक्षण यावर खर्च होणार आहे. पुढील काळात जगण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे. महामंडळाच्या सेवेसाठी सेवानिवृत्तीपर्यंत वेळ मिळाल्यास जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. नोकरी नसल्याने अडीअडचणीच्या काळात कर्जही मिळणार नाही. या सर्व प्रश्नांनी वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात गोंधळ घातला आहे. काय निर्णय घ्यायचा, या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडले आहे. शेवटी निर्णय स्वत:चा असला तरी महामंडळ काय भूमिका घेते, याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.
स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर राहिलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षाकरिता तीन महिन्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी उपदान, रजा रोखीकरण आदींचे लाभ. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा एखादे गंभीर प्रकरण प्रलंबित राहिल्यास १५ दिवसांत निकाली काढले जाईल. महामंडळाच्या नियमानुसार मोफत कौटुंबिक पास मिळेल. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर एसटी महामंडळात ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.
आयुष्याचा प्रश्नपाल्यांचे शिक्षण, आई-वडिलांचा औषधोपचार, दैनंदिन गरजा पूर्ण करताना अडचणी जाते. कर्जबाजारी असल्याने ही परिस्थिती आहे. नाेकरी राहिल्यास पुढील काळात यातून सावरता येईल.- उत्तम पाटील,वाहक, यवतमाळ आगार
अडचणी जाणवणारस्वेच्छासेवानिवृत्तीनंतर पैशांची आवक थांबेल. गरजेइतका पैसा मिळेल असे काम कुठे मिळणार नाही. मुलांचे शिक्षण पूर्ण व्हायचे आहे. पैशांची जुळवाजुळव करणे कठीण जाईल. अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.- कांचन उत्तम पाटील