पालकांना दिलासा : तीनही वर्षाचे उत्पन्न हवे सहा लाखांच्या आत अशोक काकडे - पुसददरवर्षी काढाव्या लागणाऱ्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांच्या कटकटीतून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थी आणि पालकांची सुटका होणार आहे. शासन निर्णयानुसार नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र आता तीन वर्षांसाठी मिळणार आहे. त्यासाठी तीनही वर्षातील प्रत्येक वर्षाचे उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. त्यासाठी सहा लाख रुपयांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरविण्यात आली आहे. सदर प्रमाणपत्र दरवर्षी काढावे लागत होते. त्यामुळे ऐन निकालाच्या काळात प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड उडत होती. दरवर्षी उत्पन्नाचे दाखले आणि सूत सुविधा केंद्रातील असुविधांचा सामना करावा लागत होता. मात्र नाईलाजाने प्रमाणपत्र काढावेच लागत होते. आता सामाजिक न्याय व विशेष विभागाचे अवर सचिव कि.पां. वडते यांच्या स्वाक्षरीने शासन आदेश निर्गमित झाला आहे. त्यानुसार नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र तीन वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी आहेत. पालक अथवा विद्यार्थ्याचे सलग तीन वर्ष उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना तीन वर्षासाठी नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर तीन वर्षाच्या उत्पन्नापैकी दोन वर्षाचे उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असेल तर दोन वर्षासाठी आणि तीन वर्षाच्या उत्पन्नापैकी एक वर्षाचे उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असेल तर एक वर्षासाठी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.
नॉन क्रि मिलेअर आता तीन वर्षांसाठी मिळणार
By admin | Published: July 18, 2014 12:20 AM