पुसद विभाग : वसुलीत माघारल्याने मुख्य अभियंत्यांची नाराजीयवतमाळ : घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यात माघारलेल्या पुसद येथील १२ कनिष्ठ वीज अभियंत्यांना कारणेदाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. अकोला येथील मुख्य अभियंत्यांच्या सूचनेवरून यवतमाळचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी ही नोटीस जारी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी मुख्य अभियंत्यांनी पुसद येथे आढावा बैठक घेतली. तेव्हा १२ अभियंत्यांच्या कार्यक्षेत्रात वीज बिलाची वसुली कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागण्यात आला आहे. त्यात समाधान न झाल्यास त्यांना चार्जशिटही दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्य अभियंता आता यवतमाळ व पांढरकवडा विभागातही प्रत्यक्ष जाऊन आढावा घेणार आहेत. तेथेसुद्धा वीज चोरी अधिक आणि वीज बिलाची वसुली कमी आढळल्यास आणखी काही अभियंत्यांना नोटीस दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज चोरी अधिक आणि बिलाच्या कमी वसुलीचा परिणाम थेट वीज भारनियमनावर होतो. तासंतास वीज पुरवठा खंडित राहिल्यास जनतेत वीज कंपनीविरुद्ध रोष निर्माण होतो. त्यातूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होण्याची दाट शक्यता असते. दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने शेतकऱ्यांकडील कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीला मनाई केली आहे. अन्य वीज बिलाबाबतही सक्ती न करण्याचे, मवाळ भूमिका ठेवण्याचे मौखिक आदेश आहेत. त्यानुसार या अभियंत्यांनी मवाळ भूमिका ठेवल्याचे सांगितले जाते. मात्र ही भूमिका त्यांच्यासाठी कारवाईची टांगती तलवार ठरली. दरम्यान वीज अभियंत्यांच्या संघटनेने या नोटीस व संभाव्य कारवाईचा निषेध केला आहे. सोमवारी वीज कंपनीच्या आर्णी रोड स्थित मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध सभा घेण्यात आली. तर १९ तारखेला अभियंत्यांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
१२ वीज अभियंत्यांना नोटीस
By admin | Published: January 13, 2015 11:06 PM