उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी सेवा केंद्राची केली तपासणी
महागाव : शहर आणि तालुक्यातील मुडाणा येथील कृषी केंद्रांची बुधवारी तपासणी करण्यात आली. यात सहा कृषी केंद्रचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे व पथकाने बुधवारी प्रभुदेव कृषी केंद्र, वैभव कृषी केंद्र, स्वराज कृषी केंद्र, अनुप कृषी केंद्र, कृषी सेवा केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. तपासणीदरम्यान सहा कृषी सेवा केंद्र संचालकांना विविध कारणांसाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
कृषी केंद्रांकडून युरिया, कीटकनाशकसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे सुट्टीचा दिवस असतानाही उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, तालुका कृषी अधिकारी मुकाडे यांनी कृषी केंद्रांची तपासणी केली. यात अनेकांनी आर स्टॉक बुक अपडेट ठेवले नसल्याचे आढळले. यासह विविध कारणांमुळे सबंधित सहा कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच निविष्ठा, कीटकनाशक, औषधी खरेदी कराव्यात, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनी केले. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीची पक्के बिल घ्यावी. जीएसटी नंबर आहे किंवा नाही, हे तपासूनच साहित्य खरेदी करावे. कृषी केंद्रांच्याआड वडिलोपार्जित सावकारी करू नये, अशी तंबी त्यांनी दिली. असे आढळल्यास व शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारादेखील डॉ. नाईक यांनी दिला.