अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विजेचे बिल भरणे म्हणजे रांगेत उभे राहणे आलेच. महावितरणचे कार्यालय असो किंवा बिल संकलन केंद्र असो, प्रत्येक वेळी तासभर तरी उभे राहिल्याशिवाय बिल भरता येत नाही. मात्र, आता महावितरणनेच तोडगा काढला आहे. तुम्ही स्वत:च तुमच्या मोबाईलवरून बिल भरा. नुसते तुमचेच नाही, तर इतरांचेही बिल भरून द्या. महत्त्वाचे म्हणजे त्यावर तुम्हाला कमिशनही मिळेल !महावितरणचे अधिकृत देयक संकलक बनणण्याची संधी प्रत्येकासाठी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी केवळ महावितरणने तयार केलेला पेमेंट वॉलेट अॅप तुम्हाला मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावा लागेल. त्यानंतर महावितरणच्याच संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. महावितरणकडून अर्ज मंजूर झाल्यावर व जागेची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही महावितरणचे अधिकृत वॉलेटधारक बनाल. तुम्हाला तुमच्या परिसरातीलच नव्हे तर कोणत्याही वीज ग्राहकाचे बिल तुमच्या वॉलेटमधून भरून देता येईल. अशा प्रत्येक पावतीवर महावितरणकडून ५ रुपयेप्रमाणे कमिशन दिले जाणार आहे. वीजबिलाचा भरणा सुलभ करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात हे पेमेंट वॉलेट दोन दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे.
- फायदा कोणा-कोणाला?महावितरणच्या वॉलेटमुळे आता कोणत्याही बेरोजगाराला कमिशन कमावण्याची संधी मिळणार आहे. शिवाय महावितरणचीही बिल वसुलीची डोकेदुखी कमी होणार आहे. वसुलीचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सामान्य ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. महावितरणच्या कार्यालयात जाऊन, संकलन केंद्रात जाऊन बिल भरण्याची कटकट टळणार आहे. अनेक वॉलेटधारक घरोघरी फिरून वसुली करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरबसल्या बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
- कोणती कागदपत्रे लागणार?वॉलेटधारक होण्यासाठी इच्छूक तरुणांना आपले आधार, पॅनकार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदींच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड कराव्या लागतील. महावितरणकडून मंजुरी मिळाल्यावर सुरवातीला वॉलेटधारकाला पाच हजारांचे वॉलेट रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर कोणत्याही ग्राहकाकडून वीजबिलाची वसुली वॉलेटधारक करू शकणार आहे. वसुली होताच ग्राहकाला तत्काळ एसएमएस मिळणार आहे. विशेष म्हणजे, एकाच वॉलेटचा बॅलेन्स वापरून विविध लॉगीनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून बिल वसुलीचे काम करता येणार आहे. त्यामुळे एका वॉलेटधारकाला आपल्या हाताखाली आणखी काही जणांना काम देता येणार आहे.
बेरोजगार तरुण, बचतगटांना संधीआवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला महावितरणचे वॉलेटधारक होता येणार आहे. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होणार आहे. कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, छोटे-मोठे व्यापारी, बचत गट, वीज मीटर रिडींग व बिलवाटप एजन्सी वॉलेटधारक होऊ शकतात. वॉलेटधारकास प्रती बिलामागे ५ रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येणार आहे.