लोकमत न्यूज नेटवर्क वणी : तालुका प्रशासनाने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधणे, मतदान केंद्र शोधणे अगदी सहज सोपे व्हावे, यासाठी वोटर हेल्पलाइन अॅप, टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्याचा फायदा नागरिकांना घरबसल्या करता येईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
मतदारांच्या सोयीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून, यावरून मतदार यादीतील नावाची माहिती घेता येईल. तसेच शासनाच्या संकेतस्थळावरदेखील मतदाराचा तपशील शोधता येणार आहे. वोटर हेल्पलाइन, अॅपवरदेखील ही सुविधा आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. मतदार आपले नाव ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तपासू शकतात. त्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या लिंकवर जाताच एका पेजवर नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्टा कोड टाकावा लागेल आणि यादी उघडल्यावर आपले नाव शोधावे. याच संकेतस्थळावर ईपीआयसी किंवा मतदार आयडी क्रमांकाद्वारे यादीतील नाव तपासू शकता. ईपीआयसी क्रमांक आणि राज्य निवडून, नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्हाला कळेल.
मतदार हेल्पलाइन अॅप वोटर हेल्पलाइन या अप्लिकेशनद्वारे नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती आदी सुविधा उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करून घेता येते. वणी विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे मतदार म्हणून नावनोंदणी केलेली असल्यास आपले नाव असल्याची खात्री आताच करणे गरजेचे आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून तसेच मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅपवरून हे तपासता येणार आहे.
"मतदारसंघातील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असत्याची खात्री करून लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. घरबसल्या नाव शोधण्यासाठी टोल फ्री किंवा वेबसाइटचा वापर करावा."- निखिल धुळधर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी