लोकनाथ यशवंत : तळागाळातील माणसाचा विचार करणारे साहित्य यवतमाळ : भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे. जुन्या रुढी आणि परंपरात अडकलेले हिंदुस्थानी साहित्य भ्रमीत करणारे असल्याने गलितगात्र असणाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे दलित साहित्यच दर्जेदार साहित्य असल्याने यानंतर नोबेल पुरस्कार मिळाला तर तो दलित साहित्यालाच मिळेल, असे मत प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. सातव्य आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येथे आले असता ते प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, काव्य हा परिपूर्ण प्रकार असून छोटी गोष्ट मोठी करून सांगणे त्यामुळे शक्य होते. फॅशन प्रमाणे काव्यातही बदल होत असतात. यातून नक्कल निघून जाते आणि शेवटी दर्जेदार काव्यच काळाची ओघात टिकून राहते. काव्य गेय आहे की मुक्त छंदात आहे या पेक्षा त्याचा दर्जा महत्वाचा ठरतो. कविता वाचल्या बरोबर त्या कवितेत कवीची छाप दिसली पाहिजे, जेणे करुन कवितेच्या खाली कवीला आपले नावसुद्धा लिहिण्याची गरज पडणार नाही. कवी लोकनाथ यशवंत यांचा ‘बाकी सर्व ठिक आहे’ हा काव्य संग्रह एवढ्यातच प्रकाशित झाला आहे. कवीते व्यतिरिक्त आपण कोणत्याही साहित्य प्रकाराकडे वळलो नसल्याचे त्यांनी मान्य केले. आपली प्रकृती आणि प्रवृत्ती काव्यासाठीच पोषक आहे, असे ते म्हणाले. यवतमाळचे प्रसिद्ध कवी एजाज जोश यांच्या ‘जेरबंद’ या काव्य संग्रहाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. याशिवाय निदा फजलींच्या ‘माणूस बेजार इथे आणि तिथे’ या काव्य संग्रहाचा आणि ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘शब्द कभी झुट नही बोलते’ या काव्य संग्रहाचा मराठी अनुवाद केला आहे. अनेकदा माझ्या कवितांवरही आक्षेप घेतले जातात. त्यात नावीन्य नाही, असे आरोप होतात. परंतु मी त्याची पर्वा करीत नाही. आपल्या पद्धतीने जीवन जगताना जे चांगले आहे, त्याच्या मागे जाण्याचा माझा स्वभाव आहे. लहान मुल जसे स्वत:च्या इच्छेप्रमाणे हसते-बागडते, आपल्या पद्धतीने जीवन जगते तसे मुल मी माझ्या मनात जीवंत ठेवले आहे. जिलेबी सारख्या भारतीय साहित्यात माझे मन रमत नाही. यापुढेही मी फक्त स्वत:च्या शैलीतच दर्जेदार काव्य निर्मिती करीत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
आता दलित साहित्यालाच नोबेल पुरस्कार
By admin | Published: February 28, 2017 1:23 AM