लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वसामान्य जनतेला पोलीस मित्र वाटावा, पोलिसांना जनतेत मिसळता यावे म्हणून आता पोलिसांना पेट्रोलिंगसाठी सायकल देण्याचा प्रस्ताव आहे. जिल्हा नियोेजन समितीच्या नावीण्यपूर्ण योजनेतून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर यवतमाळात हा प्रयोग राबविला जाणार आहे.पोलीस दलातील कर्मचारी तंदुरूस्त रहाावे, त्यांचे वाहन प्रदूषणमुक्त असावे, सर्वसामान्यांना पोलीस जवळचे वाटावे, यासाठी पोलिसांना पेट्रोलिंगकरिता चक्क सायकल देण्याचा प्रस्ताव आहे. प्रारंभी १६ तालुक्यात १६ आणि जिल्हा मुख्यालयात ३, अशा एकूण १९ सायकली देण्याचे प्रस्तावीत करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या नावीण्यपूर्ण योजनेतून या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.सायकल हा प्रकार वाहनात मोडतो काय, याची व्याख्या जिल्हा प्रशासनाने गुरूवारी तपासून पाहिली. पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांची या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक झाली. त्यामुळे येत्या काही दिवसात पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरूवारी चक्क पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सायकलवरून शहरात फेरफटका मारला. यामुळे काही काळ पोलिसही चक्रावून गेले होते.प्रायोगिक तत्त्वावर या प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे. त्याची चाचपणी सुरू आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर जिल्ह्यातील इतर ठाण्यांमध्ये अंमलबजावणी केली जाईल.- अमरसिंह जाधवअपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ
आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:07 PM
सर्वसामान्य जनतेला पोलीस मित्र वाटावा, पोलिसांना जनतेत मिसळता यावे म्हणून आता पोलिसांना पेट्रोलिंगसाठी सायकल देण्याचा प्रस्ताव आहे.
ठळक मुद्देनावीन्यपूर्ण प्रस्ताव : मुंबईच्या धर्तीवर यवतमाळात प्रयोग