लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९४ रुग्ण आढळून आले आहे. याची संख्या दररोज वाढत आहे. अशा परिस्थितीत या आजाराला नियंत्रित करण्यासाठी टेमिफॉस ॲक्टिव्हिटी राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. हिवताप विभागानेही त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी पुढाकार दर्शविला आहे. यवतमाळात सर्वाधिक रुग्ण असल्याने यवतमाळ उपाययोजनांसाठी केंद्रबिंदू असणार आहे. यवतमाळ तालुक्यात आतापर्यंतचे सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यावर आणि स्वच्छ पाण्यावर डेंग्यूचे डास तयार होतात. यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययाेजना झाल्या नाहीत. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीत शहरावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने टेमिफॉस ॲक्टिव्हिटी राबविण्यात येणार आहे. यामध्ये साचलेले पाणी ज्या भागात असेल अथवा डबक्यांवर विशिष्ट प्रकारच्या औषधाचे द्रावण टाकले जाणार आहे. यामुळे डासांचे उत्पत्ती केंद्र नष्ट होतील. यातून डासांचा प्रकोप थांबेल आणि डेंग्यूसारख्या आजारावर मात करता येईल. यासाठी शहरात जागृती करण्यात येणार आहे. एक दिवस कोरडा दिवस पाळण्यासाठी यवतमाळकरांना आवाहन करण्यात येणार आहे. यामुळे डासांची उत्पत्ती आपोआपच संपुष्टात येईल. नगर परिषदेकडे फॉगिंग मशीन उपलब्ध आहे. मात्र ती पुरेशी नाही. शहरात सर्वच ठिकाणी डासांचा उपद्रव असल्याने सर्वच प्रभागात ही ॲक्टिव्हिटी राबविली जाणार आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार दूर ठेवण्यास मदत होणार आहे.
सर्वच विभाग जाणिवजागृती करणार - शहरातील डेंग्यूचा प्रकोप पाहता शहरातील स्वच्छता यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. यासोबतच हिवताप विभाग आणि आरोग्य विभागही शहरातील विविध भागांमध्ये जाणीवजागृती करून डासांचे उत्पत्ती केंद्र नियंत्रणात ठेवण्यासाठी टेमिफॉस ॲक्टिव्हिटीसोबत कोरडा दिवस पाळण्यास सांगणार आहेत. यामुळे शहरातील डासांचा उपद्रव नियंत्रणात येण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.