रूपेश उत्तरवार
यवतमाळ : गॅस गळती आणि गॅस चोरी या दोन प्रमुख बाबी गॅसधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेकदा किचनमधील गॅस स्वयंपाक करताना अचानक संपतो. त्यातून कुटुंबीयांची चांगलीच फजिती होते. सोबत आर्थिक नुकसान होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गॅस सिलिंडर कंपनीने पारदर्शक सिलिंडरची निर्मिती केली आहे. त्यामुळे गॅस माफियांना लगाम बसण्याची शक्यता आहे.
पारदर्शक सिलिंडर बाजारात येणार आहे. त्याचा पहिला प्रयोग यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही असे सिलिंडर लवकरच पोहोचणार आहेत. केरोसीनमुक्त जिल्ह्यात स्वयंपाकाकरिता गॅसचा वापर वाढल्याने सिलिंडरची संख्या वाढली. सोबतच गॅसची चोरी आणि लिकेजेसचे प्रमाणही वाढले आहे. गॅस गळतीने अनेक दुर्घटना घडतात. त्यात अनेक कुटुंबांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
सध्या घरोघरी लाेखंडी गॅस सिलिंडर आहेत. त्याचे वजन अनेकांना पेलवत नाही. याशिवाय अशा गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी झाली तरी कळत नाही. अथवा गॅस गळती झाल्यानंतरही वास आल्याशिवाय गळती कळत नाही. या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी इंडियन गॅसने पुढाकार घेतला आहे. ५ ते १० किलो वजनामध्ये असे पारदर्शक सिलिंडर निर्मितीचे काम कंपनीने हाती घेतले आहे. या सिलिंडरची कंपोझिटपासून निर्मिती करण्यात आली आहे. हे सिलिंडर गंजत नाही. याशिवाय लोखंडी सिलिंडरच्या तुलनेत वजनाने हलकेे आहे.
पारदर्शक असलेल्या या सिलिंडरवर ठराविक अंतरावर रेषा दर्शविण्यात आल्या आहेत. त्यातून सिलिंडरमध्ये गॅस किती उपलब्ध आहे, याची माहिती तत्काळ कळते. विशेष म्हणजे सिलिंडरमध्ये असलेला गॅस कोणी काढला तर नाही ना, याची माहितीही सिलिंडरच्या पारदर्शक रेषांमधून कळते. यामुळे गॅस संपण्यापूर्वीच आपल्याला गॅस आणावा लागेल, याची स्पष्ट कल्पना मिळणार आहे. याशिवाय गॅस गळती होत असेल, तर त्याची माहिती सिलिंडरच्या पारदर्शक रेषांवरून लक्षात येणार आहे. यामुळे ग्राहकांचे नुकसान आणि अपघात टळण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.
सिलिंडर एक्स्चेंज करता येणार
नवीन पारदर्शक सिलिंडरडिसेंबर अखेरपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच ते मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना आपले सिलिंडर जमा करून असे पारदर्शक सिलिंडर मिळविता येणार आहे. त्याकरिता अतिरिक्त सुरक्षा डिपॉझिट एकदा जमा करावे लागेल. त्यातील गॅस पूर्वीच्या दरानुसारच मिळणार आहे.