पांढरकवडा - यवतमाळ येथे ग्रँड मराठा फाउंडेशन या बिगर सरकारी संघटनेने महराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता मदतीचा हात पुढे केला आहे. पांढरकवडा भागातील शेतकऱ्यांच्या 11 मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च या संस्थेकडून उचलण्यात आला आहे. यासाठी एकूण रु. 1,10,000 चे प्रायोजित धनादेश या मुलांना सुपूर्द करण्यात आले.
एनआरआय तरूण रोहित शेलाटकर यांच्या द्रष्टेपणातून साकारलेल्या या कार्यक्रमात किशोर तिवारींनी उपस्थिती लावली होती. शेतकऱ्यांच्या मुलांना पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागते अशी परिस्थिती असताना ज्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रायोजकत्व देण्यात आले ती अभियांत्रिकी, औषधशास्त्र आणि कृषी अशा विविध शाखांमध्ये शिकत आहेत. या माध्यमातून मुलांना स्वतंत्र आणि स्वंयपूर्ण बनविण्याचा उद्देश असल्याचं ग्रँड मराठा फाउंडेशनचे रोहित शेलाटकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ग्रँड मराठा फाउंडेशनचे रोहित शेलाटकर म्हणाले की, “आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यासाठी सज्ज करायची इच्छा आहे. त्याकरिता त्यांच्या विकासासाठी साधन-तंत्र उपलब्ध करून देण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.” मागील वर्षभरात ग्रँड मराठा फाउंडेशन शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याच्या हेतूने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पोहोचले असून शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वपरीने साह्य करत आहे. यापैकी काही उपक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना पीठ दळायची चक्की व शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आले, सोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तंत्रांची माहितीही पुरवण्यात आली होती.
ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जाते, त्यामध्ये आधुनिक तंत्राची योग्य किंमत समाविष्ट असून शेतकऱ्यांच्या पाठी लागलेले कर्ज व गरिबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या फाऊंडेशनकडून विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले उत्तम शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साह्य देऊ करण्यात येते, त्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक क्रियाकलाप राबवून विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाळांना संगणक दान करून त्यांनी ई-लर्निंगची ओळख करून दिली व त्याला प्रोत्साहन देत आहेत.