लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख फ्रंट लाईन वर्कर असलेल्या जिल्हा पोलीस दलातही कोरोना संसर्ग खोलवर रुजताना दिसतो आहे. आतापर्यंत पोलिसातील तब्बल २९२ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामध्ये ४३ अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या लढ्यात आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने जिल्हा पोलीस दलातील प्रमुखांना ही संसर्गापासून सोडले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हेसुद्धा कोरोनाबाधित झाले. कोरोनावर मात करून गेल्या आठवड्यात धारणे तर सोमवारी १२ एप्रिलला एसपी डॉ. भुजबळ कार्यालयात परतले. यावेळी धारणे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांनी एसपीचे स्वागत केले. यानिमित्ताने गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलातील कोरोना बाधितांच्या आकड्यावर नजर टाकली असता हा आकडा तीनशेच्या दिशेने निघाल्याचे आढळून आले. आतापर्यंत २९२ जणांना पोलीस दलात कोरोना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी ४३ अधिकारी तर २४९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील यवतमाळ शहर ठाण्यातील पोलीस हवालदार व पांढरकवडा ठाण्यातील नायक पोलीस शिपायाचा काेरोनाने मृत्यू झाला. २९२ पैकी २३६ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून ते कोरोनामुक्त होऊन कार्यालयात परतले आहे. तर दहा अधिकारी व ४४ कर्मचारी अद्यापही असे ५४ जण कोरोनाशी लढा देत आहेत. ते सर्वजण गृह विलगीकरणात आहेत. सोमवारी कार्यालयात परतलेल्या एसपी भुजबळ यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुष्पवर्षाव करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास कोरोना बाधित झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी खासगी उपचार ऐवजी शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास दर्शवित सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याला पसंती दर्शविली. समाजातील विविध घटकांनीसुद्धा शासकीय कोविड सेंटरमध्येच दाखल होणे पसंत केले.