शहरात विविध रोग पसरविणाऱ्या ''अना फिलिप'' डासांच्या मादीच्या चाव्याने हिवताप रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. रुग्णालयातील रुग्णसंख्या पहिली तर त्यात मलेरिया, टायफॉइडसह डेंग्यूचे रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शहरात नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पावसाळ्याच्या दिवसात घाणीत डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या काही महिन्यापासून वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी नगर परिषदेने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. डासांनी घेतलेल्या चाव्यामधून रोगाला कारणीभूत असलेल्या पर जीविकाचा शरीरात प्रवेश होतो. त्यापासून डेंग्यू, ताप, हत्तीपाय, हॅलोपिअर, ब्रेन ट्यूमर आदी जीवघेण्या आजाराची भीती बळावली आहे. शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाढलेल्या डासांवर प्रतिबंधक उपाय न झाल्यामुळे हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ डेंग्यूचेही रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांची गर्दी वाढल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. डासांचे प्रमाण असे कायम राहिल्यास हळूहळू इतर जीवघेणे आजारही शहरवासीयांना जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी नगर परिषदेने मोठ्या प्रमाणावर डास प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील नाल्यांची साफसफाई करणे तसेच फॉगिंग मशीनने डास प्रतिबंधक औषधाची फवारणी मारण्याचे काम नियमितपणे सुरू ठेवण्याची गरज आहे. डासांच्या चाव्यामुळे अद्याप केवळ हिवताप व डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण दिसत आहे. मात्र कालांतराने जीवघेण्या आजाराचे बळी ठरू शकतात. नागरिकांचा नाहक बळी जाऊ शकतो. याकडे नगर परिषद प्रशासन व हिवताप विकास विभागाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बॉक्स : ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत झाली वाढ
ग्रामीण भागातही मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. नियमित नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे नाल्याही तुंबल्या आहेत. त्यात डासांची पैदास होत आहे. हेच डास आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. किमान गावातील नाल्यांची नियमित साफसफाई करण्यासाठी तरी ग्रामपंचायतीने पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यातून काहींना आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.