चार महिन्यांचे पैसे आले : आठवडाभरात थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा होणार निधी यवतमाळ : महिनोन्महिने न मिळणारा शालेय पोषण आहाराचा निधी आता तातडीने अदा करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळांना गेल्या सहा महिन्यांपासून न मिळालेला आहाराचा निधी येत्या आठवडाभरात मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा निधी तातडीने पोहोचावा यासाठी थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. शालेय पोषण आहाराकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या वाट्याचा निधी जिल्हास्तरावर प्राप्त झाल्याची माहिती आहे. साधारण पावणे तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंचायत स्तरावरून आलेल्या मागणीनुसार आहाराचा निधी आठवडाभरात वितरित केला जाणार आहे. जवळपास ५० टक्के शाळांची देयकेही तयार झाली आहेत. जिल्ह्यातील शाळांना गेल्या सहा महिन्यांपासून पोषण आहाराचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांना पोषण आहारासाठी स्वत: खर्च करावा लागला. आता एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांचे अनुदान देण्यात येणार आहे. तर आॅगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिवाळीपूर्वी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर्तास ‘एमडीएम’वरील नोंदी दुर्लक्षित करण्यात आल्या आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ४निधी वितरणाची पद्धत यावेळी बदलण्यात आली आहे. पूर्वी जिल्हास्तरावरून पंचायत समित्यांना वंटन आदेश पाठविला जात होता. त्यानंतर पंचायत समितीकडून केंद्रस्तरावर आणि तेथून शाळांपर्यंत निधी दिला जात होता. मात्र, ही लांबलचक पद्धत आता खंडित करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरून थेट शाळांनाच निधी दिला जाणार आहे. पंचायत समिती आणि केंद्र हे दोन टप्पे कमी करण्यात आले आहेत.
पोषण आहार निधीतील अडथळे अखेर दूर
By admin | Published: September 16, 2016 3:04 AM